गुहागर – शासकीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार लक्षद्वीप व लगतच्या भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागात वादळी पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गुहागर तालुक्यातील सडे जांभारी, काताळे, पडवे,तवसाळ,तवसाळ खुर्द, नरवण आदी परिसरात जोरदार पाऊस बरसला. या अवकाळी पावसामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर आंबा काजू पिक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कोकणात भात पिकाची शेती करताना हळवी (39 ते120 दिवसात कापणीस योग्य) आणि महान (120 ते 150 दिवसात कापणीस योग्य) अशा दोन प्रकारात भात शेतीचे उत्पन्न घेतले जाते. हळवी भातशेती कापुन पूर्ण करून त्या पिकाच्या एकत्रित अडव्या केल्या आहेत. तर काही ठिकाणी भाताची मळणी – झोडणी करून धान्य एकत्रित साठविण्यात आले आहे. तर महान भात पिकाची कापणी अंतिम टप्प्यात आली असताना आज पडलेल्या अवकाळी पावसामुळे हे महान पद्धतीतले भात पीक अडचणीत आले आहे.सध्या ग्रामीण भागात मजुरांची उपलब्धता नसल्याने भात कापणी साठी आणि भाताच्या मळणी साठी यंत्र साधनांचा पर्याय अवलंबला जात आहे. शेतकरी चारी बाजूुनी संकटात असताना वारंवार समुद्रात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे आणि त्यामुळे निर्माण होणारी वादळ सदृश्य पावसाची परिस्थिती या हवामानाच्या बदलामुळे कोकणातील भात शेती करणारा,नाचणी वरी पिकवणारा, आंबा – काजु उत्पादन करणारा शेतकरी चारही बाजूने संकटात सापडला आहे.आज दिवाळीच्या मुहूर्तावर पडलेल्या अवकाळी पावसामुळे भातपिकाच्या बांधलेल्या पेंड्या आच्छादित करून झाकून ठेवाव्यात लागल्या आहेत तर काही ठिकाणी पूर्ण तयार झालेले कापलेले भात शेतामध्ये तसेच पसरून ठेवण्याची वेळ शेतकरी राजा वर आले आहे. वारंवारच्या हवामानातील बदलामुळे शेतीवर परिणाम होत असल्याकारणाने कोकणातील शेतकरी शेतीपासून दूर होत चालला आहे.याकडे सर्व स्तरावरच्या शासनकर्त्यांनी लक्ष देणे काळाची गरज आहे.