चिपळूण – काय गुन्हे दाखल करायचे ते करा…तुमची यंत्रणा आणि माणसे रस्त्यावर कशी फिरतात तेही बघू…तुम्हाला जाब विचारणारा इथे मनसे आहे…प्रथम खड्डे भरा नंतरच नवीन काम सुरू करा…असा इशारा देत महामार्गाचे काम मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे आणि मनसैनिकानी बंद पाडले…ईगल कंपनीच्या अधिकाऱ्यांची मस्ती आणि माज उतरवताच पोलिसांनी मध्यस्थी करीत खड्डे भरण्यास सुरवात केली. मनसेच्या दणक्याने ईगलची यंत्रणा मात्र आज खऱ्या अर्थाने महामार्गावर उतरली.
ईगल कंपनीने पाऊस कमी होताच चौपदरीकरण कामाला सुरुवात केली आहे. एका बाजूला महामार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. धुळीचे लोट उठत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून कंपनीने पंचायत समिती समोर आणि कामथे घाटात काम सुरू केले आहे. खड्डे भरण्याच्या मागणीकडे कंपनीने दुर्लक्ष केले आहे. कंपनी विरोधात कोणत्याही पक्षाने अथवा अन्य सामाजिक संस्थांनी आक्रमक आंदोलन केले नाही आणि कोण करणार ही नाही याची पक्की खात्री असल्याने काम सुरू करण्यात आले होते. मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे तालुका उपाध्यक्ष अभिनव भुरण, प्रतापराव भोसले, संजय रसाळ, मिलिंद देसाई, राकेश कदम, संतोष हतीसकर, प्रशांत बाद्रे, शहराध्यक्ष गणेश भोंदे, गुरू पाटील, परेश साळवी, रवींद्र जाधव व मनसैनिक आज या विरोधात रस्त्यावर उतरले पं.स. समोर पोकलेनने काम केले जात असताना संतोष नलावडे यांनी त्याला काम थांबवण्याचा इशारा देताच काम थांबले.
संतोष नलावडे व मनसैनिकांनी काम थांबवताच ईगलचे जयंतीशेठ आणि महामार्ग विभागाचे अधिकारी दाखल झाले. यावेळी पाऊस पडत आहे खड्डे कसे भरणार अशी थातुरमातुर उत्तरे देण्यास सुरू केले. प्रचंड ऊन होते तर बाजूनी जाणाऱ्या गाड्याचा धुरळा अंगावर उडत होता. यावेळी कंपनीचे जयंतीशेठ यांनी आपण बाजूला सावलीत जाऊया असे स्पष्ट करताच तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांनी माझ्याबरोबर तुम्ही थबायचे. जो पर्यंत खड्डे भरण्यास सुरुवात होत नाही तोपर्यंत तुम्हाला सोडणार नाही अशी भूमिका जाहीर करीत जयंतीशेठ मनसैनिकांबरोबर उन्हात उभे होते. मनसे काय करू शकते ते बघाल. तुम्हाला काय वाटले आम्हाला कोणी विचारनारे नाहीत. आम्ही करू ते सहन करतील. आम्ही सर्वांना बरोबर घेतले आहे अशी जर मानसिकता असेल तर बघा, तुम्हाला जाब आणि अन्यायाविरोधात चोख उत्तर देयला मनसे आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा दिला. बराच वेळ गोंधळ सुरू होता. याचवेळी पोलिसांना याची कल्पना देण्यात आली. पोलीस निरीक्षक श्री. शिंदे यांनी मनसैनिकाना काम का अडवलेत याचा जाब विचारताच प्रथम यांनी खड्डे भरावे आणि कामाला सुरुवात करावी, आम्ही टॅक्स भरतो आहोत, खड्डे आणि धुळीने प्रवाशी हैराण झाले आहेत आणि हे काम आटोपण्यासाठी धडपड सुरू आहे मग अजून किती दिवस खड्ड्यातून जायचे असा सवाल केला.
खड्डे भरणार आहात का असे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी विचारताच आम्ही आताच सुरुवात करीत आहोत असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असताना जो पर्यंत संपूर्ण खड्डे भरले जात नाहीत तो पर्यंत आम्ही काम सुरू करून देणार नाही, असा इशारा दिला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करीत दोन दिवसांची मुदत दिल्याने आणि खड्डे भरण्यास सुरुवात केल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. ईगल कंपनीच्या अधिकारी वर्गाची मस्ती आज मनसेच्या तालुकाध्यक्ष आणि मनसैनिकानी चांगलीच जिरवली. कोणीही जाब विचारणार नाही या अविर्भावात राहणाऱ्या अधिकाऱ्यांना आज खड्डे भरण्यास सुरुवात करावी लागली असून प्रवाशीवर्गाकडून मनसेचे कौतुक केले जात आहे.