गुहागर – गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर छोटे-मोठे व्यवसायिक तात्पुरत्या स्वरूपात गाळे उभारुन पोटापाण्याचा व्यवसाय करीत आहेत. गुहागरमध्ये नगरपंचायत अस्तित्वात येण्यापूर्वी या व्यावसायिकांकडून ग्रामपंचायतीमार्फत कर आकारणी केली जात होती. त्याचवेळी समुद्र किनाऱ्यावरील जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी सुधा या व्यवसायिकांनी वेळोवेळी पत्राद्वारे मेरीटाईम बोर्डाकडे केलेली आहे. मात्र नुकतेच बंदर विभागातर्फे या व्यावसायिकांना कारवाईची नोटीस बजावली आहे. सदरील कारवाई विरोधात गुहागरवासीयांनी एकत्र यावे, असे आवाहन ॲड. संकेत साळवी यांनी केले आहे.
समुद्र किनाऱ्यावरील सर्व व्यवसायिक हे गुहागरचे स्थानिक रहिवासी आहेत. त्यांच्या व्यवसायामुळे पर्यटकांना कोणतेही नुकसान होत नसून उलट पर्यटकांना सुविधाच होत आहे. समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी भेळ, पावभाजी, रगडा पुरी, शेव पुरी असे चाट पदार्थ मिळणार नसतील तर कोणता पर्यटक इथे थांबणार आहे ? मेरीटाइम बोर्डाने या व्यावसायिकांना त्यांचे अतिक्रमित गाळे काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे. त्याविरोधात या सर्व व्यवसायिकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. ही सुनावणी प्रलंबित असताना मेरीटाईम बोर्डाकडून मात्र अत्यंत घाईघाईने हे गाळे पाडण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे समजले आहे.त्यामुळे गुहागरच्या सर्व पर्यटनप्रेमी नागरिकांनी पक्षभेद व राजकीय मतभेद बाजूला ठेवून गुहागरचे पर्यटन अबाधित ठेवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. ज्यावेळी अशा स्वरूपाची धडक कारवाई प्रशासनामार्फत करण्यात येईल त्यावेळी गुहागरमधील असंख्य पर्यटन प्रेमी नागरिक या कारवाईच्या विरोधात एकत्र येतील यात शंका नाही, असे साळवी म्हणाले.