मुंबई- राज्य सरकारी कर्मचार्यांना व इतर पात्र कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. 1 जुलै 2021 पासून महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ करण्याचा निर्णय झाला. महागाई भत्ता आता 17 टक्क्यांवरुन 28 टक्के इतका झाला आहे. या निर्णयामुळे कर्मचार्यांची दिवाळी गोड होणार आहे.
हा महागाई भत्ता वाढ 1 ऑक्टोबर 2021 पासून रोखीने देण्यात यावी, असा शासन निर्णय आज घेण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ते गोठण्यात आले होते.
पण आता राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारत असताना कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या तोंडावर राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. या वाढीमध्ये 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासूनच्या महागाई भत्ता वाढीचा समावेश आहे. मात्र 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत महागाई भत्त्याचा दर 17 % इतकाच राहील. तसेच 1 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2021 या 3 महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे निर्देश आहेत.