चिपळूण – चिपळूण शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात सोशल डिस्टनशिंगचा फज्जा उडत आहे. तर या कार्यालयाच्या शेडमध्ये अधिकाऱ्यांनी आपली दुचाकी वाहने उभी केली असल्याने सदनिका नोंदणी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना शेडबाहेर तिष्ठत रहावे लागत आहे. पर्यायाने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी या विषयाकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात सदनिका खरेदी नोंदणी, बक्षिसपत्र, हक्कसोड पत्र आदी कागदपत्रांची नोंदणी केली जाते. चिपळुनात या कार्यालयात दररोज नागरिक हजेरी लावत असतात. सध्या कोरोनाचा कालावधी असून शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टनशिंग आदी नियमांचे पालन करायचे आहे. मात्र, येथील कार्यालयाकडून अंमलबजावणी होताना दिसत नाही.-तसेच या कार्यालयाच्या बाहेर नागरिकांना कोणतीही बसण्याची व्यवस्था नाही. यामुळे या कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांना तासन्तास उभे रहावे लागत आहे. विशेष म्हणजे या कार्यालयातील अधिकाऱ्यांची वाहने शेडमध्येच उभी केली असल्याने नागरिकांना शेड बाहेर पुन्हा पावसात उभे रहावे लागते एकंदरीत या कार्यालयात कामासाठीआलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.