मार्गताम्हाणे – चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथे कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रामपूर विभागात इतर गावे कोरोनामुक्त होत असताना मार्गताम्हानेतील वाढता प्रादूर्भाव सर्वांचीच चिंता वाढविणारा ठरला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मार्गताम्हानेतआजपर्यंत दोन तरुणांचा व एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण पाँझीटीव्ह संख्या 67 झाली असून सतर्क झालेल्या आरोग्य विभागाने गावात चाचण्या वाढविण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.
चिपळूण-गुहागर मार्गावरील मार्गताम्हाने गाव मध्यवर्ती आहे. सुमारे 20 गावांची बाजारपेठ असून नेहमीच येथे बाहेरील नागरिकांची वर्दळ असते. सर्व प्रकारची रुग्णालये, बँका, पतसंस्था, मासळी मार्केट असल्याने दररोज येथे गर्दी दिसून येते. अलिकडे गावात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव चिंता वाढविणारा ठरला आहे. रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक गावात लक्ष ठेऊन असून आजपर्यंत केलेल्या चाचण्यात तब्बल 67 पाँझीटीव्ह रुग्ण सापडलेले आहेत. एकाच वाडीत 34 रुग्ण सापडले असून येथे चाचण्यांची मोहीम युध्दपातळीवर सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाजारपेठ पूर्णतः बंद
ठेवण्यात आलेली आहे. नुकतीच चिपळूण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीने बैठक घेऊन यावर कोणत्या उपाययोजना राबवायच्या त्याबाबत चर्चा केली. ग्रामकृती दल सक्षम करणे, घरोघरी सर्व्हे करुन आरोग्य विभागाकडून चाचण्या करुन घेणे, जनजागृती करणे यावर भर देण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांनी काळजी घेऊन आपले कुटुंब, गाव सुरक्षित ठेवावे असे आवाहन सरपंच प्रभाकर चव्हाण यांनी केले आहे.