चिपळूण ; मार्गताम्हाणे गावाचे आरोग्य का बिघडले?

0
833
बातम्या शेअर करा



रामपूर विभागातील बहुसंख्य गावे कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना या भागातील मार्गताम्हाने गाव याला अपवाद ठरले आहे. दिवसेंदिवस मार्गताम्हानेत कोरोनाचा वाढता विस्फोट गावाच्या आरोग्याची चिंता वाढविणारा ठरला आहे. यासाठी प्रत्येक ग्रामस्थ व कुटुंबाने आपली काळजी घेणे महत्वाचे ठरले आहे. कोरोना साथीबाबत गावात कोणतीच गांभीर्यता नसल्याने या आजाराला आपणच स्वतः खतपाणी घालत आहोत, असे दिसून येत आहे. आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन यांना सर्वच ग्रामस्थांनी सहकार्य करुन गावात उपाययोजना राबविण्याबरोबरच कठोर नियमांची अंमलबजावणी केली तरच ही साथ आटोक्यात येण्यास मदत होणार आहे.

मार्गताम्हाने गाव चिपळूण-गुहागर मार्गावरील मध्यवर्ती व महत्वाचे गाव आहे. सुमारे 20 गावांची बाजारपेठ असून सर्वप्रकारची सरकारी कार्यालये
आहेत. त्यामुळे येथे नेहमीच बाहेरील नागरिक, ग्राहक, खरेदीदार यांची गर्दी असते. अशा या गावाचे आरोग्य बिघडले आहे ते कोरोना आजाराने. आजतागायत गावात 50 अँक्टीव्ह पाँझीटीव्ह रुग्णसंख्या असून आतापर्यंत 2 तरुणांचा व एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, या दुदैवी घटना दुर्लक्षित करुन चालणार नाहीत. या आजाराला रोखण्यासाठी गेले वर्षभर गावात लाँकडाऊनसारख्या कडक उपाययोजना राबविण्यात आल्या. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावाला कोरोनाचा विळखा घट्ट बसत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गावातील कोरोनाच्या निमित्ताने केवळ बाजारपेठ बंद करण्याचा मुद्दा घेऊनच आपण आजपर्यंत कोरोनावर मात करता येईल का याची वाट पहात बसलो आहोत. येथील बाजारपेठेवर अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. तुटपुंज्या भाड्यावर आपले पोट भरणारे रिक्षाचालक, छोटे मालवाहतूकदार, लहान-मोठ्या टपऱ्या चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे दुकानदार हे सर्वचजण येथील आर्थिक बाबींवर अवलंबून आहेत. बाजारपेठ असल्याने गावाला एक वेगळे महत्वही आहे. त्यामुळे बाजारपेठ बंद करणे हा यावर उपाय असला तरी मात्र, इतर उपाययोजना राबविण्यास आपण आपल्याच बेपर्वाईमुळेच सपशेल अपयशी ठरलो आहोत. विनाकारण फिरणाऱ्यांवर कोणतेही बंधन नाही. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई नाही, इतर जिल्ह्यातून गावात येणाऱ्यांना कोणतेही नियम नाहीत, ही तितकीच कारणे गंभीर आहेत. कोरोना रुग्णसंख्या असलेल्या गुहागर तालुक्यातील पालशेत गावाने बाहेरुन येणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यासारखे नियम केल्याने व गावात कडक निर्बंध योजल्याने हे गाव आज कोरोनामुक्त झाले आहे.

मार्गताम्हाने गावात कोरोना आजाराला आळा घालण्यासाठी व गावाचे आरोग्य जपण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. येथे चाचण्या वाढविल्या आहेत. आरोग्य विभागाचे हे काम असले तरी स्थानिक प्रशासनानेही काही निर्बंध लावणे गरजेचे बनले आहे. ज्या गाव-वाडीत कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत त्या वाडीतील ग्रामस्थांनी आरोग्य पथक व स्थानिक प्रशासनाला सहकार्य करणे हिताचे आहे. स्थानिक प्रशासनानेही जेथे रुग्णसंख्या जास्त आहे व रुग्णांना त्यांच्या घरात राहण्याची व्यवस्था नसेल तर त्यांना गावची सार्वजनिक ठिकाणे, शाळा, समाजमंदिरे येथे निवाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. आपले निरोगी आरोग्य हेच गावाचे व देशाचे आरोग्य ही भावना ठेऊन सर्वांनी सहकार्याच्या भूमिकेत रहावे, तरच गाव कोरोनामुक्त होईल.

प्रशांत चव्हाण मार्गताम्हणे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here