गुहागर – गुहागर तालुक्यातील सुरळ ग्रामपंचायतच्या सुरळ मोहल्ला येथील सार्वजनिक विहीरीमध्ये रात्री उनाड कुत्र्याचा पाठलाग करीत असताना बिबट्या पडला असल्याची माहिती सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आली. सुरळ गावचे सरपंच यांनी गुहागरचे वनपाल संतोष परशेटे यांना दिली.
वनपाल परशेटे यांनी बिबट्या पडल्याची माहिती अन्य अधिकाऱ्यांना दिली. विभागीय वनअधिकारी दिपक खाडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अधिकारी आर. आर. पाटील, वनपाल परशेट्ये, देवरूखचे वनपाल उपरे, वनपाल रामदास खोत, वनरक्षक मांडवकर, शिंदे, बंबर्गेकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला. सुरुवातीला दोरीच्या सहायाने विहिरीमध्ये फळी सोडण्यात आली आणि त्या फळीच्याआधारे बिबट्याला बाहेर काढून पिंजऱ्यामध्ये बंदीस्त केले. कडाक्याच्या थंडीत बिबट्यापाण्यामध्ये भिजला असल्याने तो शांत होता पण पिंजऱ्यात बंदीस्त केल्यानंतर त्याने आपले रौद्र अवतार धारण केले होते. बिबटयाचा रौद्र अवतार पाहून ग्रामस्थांची धावपळ सुरू झाली मात्र सुरक्षितपणे त्याला पिंजऱ्यासह गाडीत टाकण्यात आले व त्याला सुरक्षित स्थळी चिपळूण येथील जंगलामध्ये सोडण्यात आल्याची माहिती गुहागरचे वनपाल श्री. परशेटे यांनी दिली. बिबटयाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.