गुहागर – गुहागर तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतीमध्ये अनेक
शासकीय योजना राबवताना लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी करुन सरपंच अतुल लांजेकर आणि ग्रामसेवक यांच्यावर त्यांनी ठपका ठेवला आहे. आपण लवकरच सरपंचांवर अविश्वास दर्शक ठराव दाखल करणार
असून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. याबाबत पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना ग्रामस्थ अक्षय सकपाळ यांनी सांगितले की, डिप फ्रिजची दि. २५ सप्टेंबर २०२४ ला मागणी केलेली होती. त्याची रक्कम ४० हजार त्याच तारखेला देण्यात आली. मात्र, दि. ०८ सप्टेंबर २०२५ पर्यंत डिपफ्रीजर ग्रामपंचायतीमध्ये उपलब्धच नसल्याचे आढळून आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ ला प्रिंटर २०२४ ला खरेदी झाला असून त्याचे बिल ३२ हजार ९१६/- रुपये जमा केले आहेत. तरी दि. ०८ सप्टेंबर २०२५ पर्यंत तो प्रिंटर शाळेला मिळालेला नसल्याचे निदर्शनास आले आहे.
झोंबडी ग्रामदैवत अध्यक्ष समीर तावडे यांनी सांगितले की, सार्वजनिक
ठिकाणी पाणी सुविधा करणे यासाठी ७६ हजार ८१२ रुपये खर्च झाला परंतु प्रत्यक्ष पाहणी करता केवळ पाण्याची टाकी ठेवण्यात आलेली आहे. फोटो मात्र काम पूर्ण झालेल्याचा जोडलेला आहे. झोंबडी शाळा नं. ३ या ठिकाणी रेन हार्वेस्टिंग योजना राबविण्यात आली त्यासाठी ४४ हजार ७५० रुपये खर्च करण्यात आलेला आहे. पाणी सोडण्यासाठी जो खड्डा मारण्यात आलेला आहे तो
योग्य नाही. तसेच ती खड्डा शाळेच्या आवारात न मारता दुसऱ्याच्या जागेत मारल्याचे आढळून आले आहे. एकूणच ग्रामपंचायतीतर्फे गावात विकासकामे करताना किंवा वस्तू खरेदी करताना त्यावर खर्च प्रमाणापेक्षा जास्त करून कमी किंमतीची, कमी दर्जाची वस्तू जास्त किंमतीत विकत घेणे,, पेपर निविदा प्रसिध्दा न करता कामे करणे, न झालेली कामे कागदोपत्री दाखवून पैसे लाटणे, निकृष्ट दर्जाच्या वस्तू ग्रामस्थांना वितरित करणे असे अनेक आरोप पुराव्यानिशी करण्यात आले आहेत. दरम्यान, यावर सरपंच, ग्रामसेवक यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गुहागर गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी, याप्रकरणी सखोल चौकशी करुन कोणीही दोषी आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.