संगमेश्वर ; कलासाधनातून एकराशे कलाकृतींचा संग्रह !

0
159
बातम्या शेअर करा

संगमेश्वर- विद्यार्थ्यांची कला त्यांच्या बालवयात जतन करणे खूप महत्वाचे असते . बालवयात मुलांच्या विचारांची झेप कल्पनाशक्ती पलीकडील असल्याने त्यांच्या अंतर्मनातून उमटणारा एखादा विषय हा भल्याभल्यांना अंतर्मुख करणारा असतो . बालकलेचे महत्व ओळखून संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलने कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा संग्रह करण्याचा उपक्रम हाती घेतला . प्रजासत्ताक दिनी संस्थेचे उपाध्यक्ष अभय गद्रे आणि सदस्य अनिल शेट्ये यांच्या हस्ते २१ व्या कलासाधना चित्रकला वार्षिकचे प्रकाशन करण्यात आले .
सन २००० साली कलासाधना हा चित्रकला वार्षिक तयार करण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांच्याच संकल्पनेतून सुरु करण्यात आला . चित्रकलेतील विविध विभागांची आवड असणारे विद्यार्थी वर्षभरात ज्या कलाकृती तयार करतात त्यातील उत्तम कलाकृतींची निवड करुन कलासाधना हे चित्रकला वार्षिक तयार केले जाते . वर्षभर कला अभ्यासक्रमांतर्गत काम करीत असतांना विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी आणि या स्पर्धेतून त्यांच्या हातून उत्तमोत्तम कलाकृती निर्माण व्हाव्यात याच बरोबर ग्रामीण भागातील हे बालकलाकार भविष्यात उच्च कलाशिक्षण घेण्यासाठी शहरांत गेले तर , तेथील स्पर्धेत ते टीकावे किंबहुना पुढे जावेत हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे मुख्याध्यापिक कालिदास मांगलेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले .
कलासाधना चित्रकला वार्षिक मधील कलाकृती एवढ्या सुंदर आहेत की , त्या प्रशालेतील चिमुकल्या हातांनी रेखाटल्या असतील असे वाटतच नाही . प्रशालेकडे एकराशे कलाकृतींचा संग्रह होणे , ही शाळा आणि संस्थेला अभिमानाची बाब असल्याचे मत संस्था उपाध्यक्ष अभय गद्रे यांनी या चित्रकला वार्षिक प्रकाशनानंतर बोलतांना व्यक्त केले . शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी कलासाधना मधील चित्र आवर्जून पाहावी असे आवाहनही अनिल शेट्ये यांनी यावेळी केले . यावेळी व्यासपीठावर सचिव धनंजय शेट्ये , किशोर पाथरे , अनिल शिंदे , संदीप सुर्वे , रमेश झगडे , दिलीप रहाटे , समीर शेरे , बाबा बेंडके आदि मान्यवर उपस्थित होते .

विक्रम परांजपे ( ख्यातनाम चित्रकार ) : विद्यार्थ्यांची कला ही एखाद्या तज्ञ कलाकारालाही कधीकधी अंतर्मुख व्हायला लावते . बालकलाकारांच्या अंतर्मनातील भावविश्व ते कलेतील सर्व मर्यादा नियम ओलांडून अत्यंत निरागसपणे आपल्या कलाकृतीतून दृष्य रुपात आणत असतात . प्रसंगी बालकला समजणेही अवघड जाते . यासाठी बालकलाकारांना त्यांच्या कलाकृतीत काम करतांना नियमांच्या चौकटीत बांधून न ठेवता मोकळेपणाने काम करायला दिल्यास कागदावर त्यांच्या मनातील खरे आकार आणि रंग उमटतात . यातूनच आश्चर्यकारक चित्रे तयार होतात . पैसा फंडचा कलासाधना हा उपक्रम अशा कलाप्रेमी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून यामुळेच येथील असंख्य विद्यार्थी कलाक्षेत्रात आपली उल्लेखनीय प्रगती करीत आहेत .


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here