संगमेश्वर ; दिव्यांग मोहम्मदची भरारी नवोदीतांना उभारी देणारी

0
444
बातम्या शेअर करा

संगमेश्वर -आपल्याकडे एखादी गोष्ट कमी आहे त्याचे दु:ख न करता , अडथळा हीच संधी मानून यश खेचून आणण्याचे काम मोहम्मद खान सारखे जिद्दी आणि मेहनती विद्यार्थी करत असतात . मोहम्मद हा दोन्ही पायांनी दीव्यांग असूनही त्याने मुंबई विद्यापीठाच्या एम कॉम परीक्षेत घवघवीत यश मिळविले . त्याची ही भरारी नवोदीतांना उभारी देणारी असल्याचे प्रतिपादन ‘ मैत्रांगण ‘ चे सदस्य सुनील शेरे यांनी मोहम्मद खानच्या सत्कारा प्रसंगी बोलतांना केले .
वयाच्या दुसऱ्या वर्षी दोन्ही पायांना पोलिओ झालेल्या मोहम्मद तकसिम खान याला स्वतःच्या पायावर उभे देखील रहाता येत नाही . अशा स्थितीत पहिली ते चौथी प्राथमिक शाळेत , पाचवी ते बारावी पैसा फंड इंग्लिश स्कूल मध्ये आणि नवनिर्माण महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतांना मोहम्मदकडे एक आदर्श विद्यार्थी म्हणून पाहिले गेले . शालेय शिक्षण घेतांना मोहम्मदने कधीही आपल्या दीव्यांगत्वामुळे ना कधी शाळा चुकवली , ना कधी अनुत्तीर्ण झाला . त्याचे संपूर्ण जीवन संघर्षमय असले तरी , त्याने कधीही हार मानली नाही यातच त्याचे यश दडले असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते आणि मैत्रांगणचे सदस्य विकास शेट्ये यांनी व्यक्त केले . एम कॉमची परीक्षा यशस्वीपणे देवून या परीक्षेत द्वितीय श्रेणी मिळवणाऱ्या मोहम्मद खानचा पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या १९७५ सालच्या दहावीच्या ‘ मैत्रांगण समूह ‘ या विद्यार्थ्यांच्या वतीने रोख दोन हजार रुपये , भेटवस्तू आणि श्रीफळ देवून नुकताच सुनील शेरे , प्रदीप कोकाटे , बशीर खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी मनोगत व्यक्त करतांना मोहम्मदने आपल्या जीवनाची सारी कहाणी उपस्थितांसमोर उलगडली . यावेळी अनेकांना अश्रृ अनावर झाले . जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपण आजवर इथपर्यंतचा प्रवास केला असून आपल्यापाठी ‘ कोकण कला विकास संस्थेचे ‘ भक्कम पाठबळ असल्याचे त्याने नमूद केले . सरकारी नोकरी करुन आपल्या कुटुंबीयांना आधार द्यायचा असल्याचेही मोहम्मद याने अखेरीस नमूद केले .


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here