नीला नातू यांच्या ‘लक्ष्मी’ कथासंग्रहाचे प्रकाशन

0
349
बातम्या शेअर करा

वनस्पतीशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आणि माणसं वाचण्याच्या आवडीतून कथालेखनाकडे वळलेल्या उमरोली (चिपळूण) येथील कथालेखिका सौ. नीला नातू यांच्या ‘लक्ष्मी’ या कथासंग्रहाचे प्रकाशन रविवार (दि. २४) सायंकाळी 5.30 वाजता लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या सभागृहात संपन्न होणार आहे. मान्यवर कवी आणि समीक्षक अरुण इंगवले यांच्या हस्ते संपन्न होणाऱ्या या आनंद सोहोळ्याच्या अध्यक्षस्थानी दिलीपराज प्रकाशनचे प्रकाशक राजीव बर्वे असणार आहेत.

नीला नातू या विवाहानंतर आपले सर्जन पती डॉ. विवेक नातू यांच्यासोबत कोकणातील ग्रामीण भागात स्थायिक झाल्या. वनस्पतीशास्त्राचे करियर बाजूला ठेवून पुढे त्या क्लिनिकल लॅबमध्ये कार्यरत झाल्या. सोबत त्यांनी शेतीच्या माध्यमातून आपली वनस्पतीशास्त्राची आवड जोपासली. त्यांचे सासरे डॉ. तात्यासाहेब नातू हे आमदार असल्याने घरात माणसांचा प्रचंड राबता असायचा. घरातल्या वैद्यकीय व्यवसायामुळे विविध माणसांसोबत त्यांचा संवाद होत राहिला. हळूहळू माणसं वाचायची आवड निर्माण होत गेली. यातून पुढे या कथा लिहिल्या गेल्या. प्रस्तुतच्या कथा संग्रहात अशा पंधरा कथा आहेत. ‘फिरुनी नवी जन्मेन मी…’ असं आयुष्यात एकदा तरी म्हणणाऱ्या, आयुष्याची लढाई लढणाऱ्या स्त्रीयांच्या या साऱ्या कहाण्या आहेत. सर्व कथांमधल्या नायिका या समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या आहेत. नीला यांनी आपला हा संग्रह आयुष्याच्या प्रवासात भेटलेल्या, जीवनाची अनेक परिमाणे शिकायला मिळालेल्या, असंख्य स्त्रीयांना अर्पण केला आहे.
हा प्रकाशन सोहळा कोकण मराठी साहित्य परिषद शाखा चिपळूण आणि महाराष्ट्र साहित्य परिषद चिपळूण शाखेच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोमसापच्या चिपळूण अध्यक्ष डॉ. रेखा देशपांडे आणि मसाप चिपळूण शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here