शृंगारतळी – गुहागर तालुक्यातील जानवळे गावात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ओव्हरआर्म क्रिकेट चषक स्पर्धा स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २२ व २३ जानेवारी २०२१ रोजी नुकतीच उत्साही वातावरणात संपन्न झाली. सदर क्रिकेट स्पर्धेतील विजेता चषक आबलोली फाईज इलेव्हन या क्रिकेट संघाने पटकावला. उपविजेता चषक जानवळे गावातील शिवकमळेश्वर या संघाने संपादन केला.विजेत्या संघाला रोख ११,१११ रुपयांचे बक्षीस वआकर्षक चषक रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर उपविजेत्या संघाला रोख ७,७७७ रुपये पारितोषिक व आकर्षक चषक गुहागर पंचायत समितीचे उपसभापती सुनील पवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुहागर तालुक्यातील जानवळे गावात हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या तालुक्यास्तरीय स्पर्धेत १६ संघांनी सहभाग नोंदवून खेळ सादर केला. गुहागर तालुका प्रेस क्लब, गुहागर या संस्थेच्या पत्रकार संघाने व गुहागर पोलीस क्रिकेट संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवून खिलाडूवृत्तीने खेळ सादर केल्याबद्दलचे विशेष आकर्षण व गौरवणीय बाब या स्पर्धेमध्ये ठरली.
अंतिम सामन्यात आबलोली फाईज इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारून शिवकमळेश्वर जानवळे या
संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ षटकात ९ गडी गमावून केवळ ३२ धावांचे माफक आव्हान प्रतिस्पर्धी संघाला दिले. आबलोली फाईज इलेव्हन संघाने चौथ्या शतकात ३ विकेट गमावून विजयी ३३ धावा सहजच पार करून अंतिम विजेता चषक पटकावला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून फाईज इलेव्हन संघाचा शामु साळवी, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज फाईज इलेव्हन संघाचा सत्यम गुस्सळे, उत्कृष्ट संघाचा सिद्धेश म्हादलेकर व मालिकावीर फाईज इलेव्हन संघाचा अमित पवार यांना आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.