शिक्षकांनी शालेय वेळेत मोबाईल, व्हॉट्सॲप वापरू नये; महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे आवाहन!

0
49
बातम्या शेअर करा

:मुंबई – शाळांमधील अध्यापनाबरोबरच विविध शासकीय योजना, उपक्रम, अहवाल आणि माहिती संकलनासाठी शिक्षकांना स्वतःच्या खाजगी मोबाइलचा वापर करण्यास भाग पाडले जात असून त्याचा अध्यापन प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत असल्यामुळे शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सतत येणाऱ्या ऑनलाईन संदेशांमुळे मोबाइल हँग होणे, वैयक्तिक डाटा खर्च होणे आणि मानसिक ताण वाढणे, अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी शाळेच्या वेळेत व्हॉट्स ॲपसह ऑनलाईन माध्यमांचा वापर करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी केले आहे.

शालेय शिक्षण विभागाकडून गेल्या काही वर्षात या ना त्या कारणाने सतत माहिती भरण्याच्या जाचामुळे प्रत्यक्ष अध्यापन बाजूला पडत आहे, यानंतर निकाल जाहीर झाला की गुणवत्ता संवर्धनाच्या नावाखाली शेवटी शिक्षकांनाच जबाबदार धरले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शाळांमध्ये मोबाइलवर काम करताना विद्यार्थी आणि पालकांमध्ये गैरसमज निर्माण होत असून, शिक्षक शिकवत नसून मोबाइलवर व्यस्त असल्याचा चुकीचा संदेश जात असल्याचेही कोंबे यांनी नमूद केले. यामुळे शिक्षकांची सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिमा मलीन होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बहुतेक माहिती मागणी ही व्हॉट्सॲप ग्रुपद्वारेच होत असल्याने, पर्यवेक्षकीय यंत्रणेने स्वतःच्या सोयीसाठी तयार केलेल्या अनधिकृत ग्रुपमधून शिक्षकांनी बाहेर पडावे आणि कोणत्याही दबावाखाली पुन्हा सहभागी होऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. यापूर्वी अनेक शिक्षकांनी असे धाडस दाखवले असता त्यांच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झाली नाही, हे वास्तव असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

शाळेच्या वेळेत इंटरनेट बंद ठेवणे, व्हॉट्स ॲपवरील ‘रीड’ पर्याय बंद करणे आणि अध्यापनाच्या वेळेत ऑनलाईन कामास स्पष्ट नकार देणे हे उपाय केल्यास या जाचातून सुटका होऊ शकते, असे मत व्यक्त करण्यात आले. अत्यावश्यक परिस्थितीत दूरध्वनीद्वारे संपर्क शक्य असल्याने इंटरनेट सतत सुरू ठेवण्याची गरज नसल्याचेही सांगण्यात आले. शाळेची वेळ संपल्यानंतर कोणतेही प्रशासनिक संदेश पाठवले जाऊ नयेत, असा ‘राइट टू डिस्कनेक्ट’ वापरणे काळाची गरज बनली असल्याचे सांगत, “साहेब काय म्हणतील” या भीतीपलीकडे जाऊन शिक्षकांनी एकत्रितपणे ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन राज्यातील शिक्षकांना शिक्षक समितीने केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here