चिपळूण – चिपळूण शहरानजीकच्या वालोपे गणेशवाडी नदीकिनारी हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड मारुन २ लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याने या कारवाईला महत्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे या कारवाईवरून येथे अवैध दारूधंदे सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी निर्मूलन कार्यक्रमांतर्गत डिसेंबर महिन्यात अवैध दारू बंद विरोधात मोहीम केली होती. या कारवाईअंतर्गत गेल्या महिन्यात गावठी दारू धंद्यासह गोवा बनावटीच्या दारूचा साठा सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोहीम सुरूच राहील असा इशारा दिला होता. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सुरू असून वालोपे येथे हातभट्टी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. यानुसार विभागीय उपायुक्त वाय. एस. पवार अधीक्षक अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी गावठी दारू व रसायन असा मिळून २लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई निरीक्षक शरद जाधव, उपनिरीक्षक किरण पाटील, जवान मिलिंद माळी, सागर पवार, निनाद सुर्वे,अनिता नागरगोजे यांनी केली.
याप्रकरणी सचिन मयेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकंदरीत वालोपे येथे हातभट्ट्या सुरू नसल्याची चर्चा होती. मात्र या कारवाईने वालोपे येथे दारू धंदे सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यापुढे याच पद्धतीने अवैध दारू धंद्यांवर कारवाया सुरू राहतील असा इशारा व्ही. व्ही. वैद्य यांनी इशारा दिला आहे.