गुहागर – गुहागर तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरलेल्या तळवली, गिमवी, अडूर व तवसाळ या 4 ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत. तळवलीत शिवसेना विरूध्द गावपॅनल अशी लढत, गिमवी-देवघरमध्ये शिवसेना विरुध्द नाराज शिवसेनापुरस्कृत गाव पँनेल, अडूर विकास आघाडी आणि शिवसेना तर तवसाळमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होत आहेत. या चारही ग्रा.पं. निवडणुकांमध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
अंजनवेल जिल्हापरिषद गटातील महत्वपूर्ण अशा तळवली ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान पंचायत समिती सभापती विभावरी मुळे व राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विनायक मुळे यांचा येथे कस लागणार आहे. त्यामुळे या गावातील निवडणुकीकडे सर्वच राजकीय पदाधिका-यांचे लक्ष लागून राहिले आहे. ही ग्रामपंचायत एकूण ९ सदस्यांची असून या ठिकाणी 2 सदस्य हे बिनविरोध आले आहेत तर 7 सदस्यांसाठी मतदान होणार आहे. मुळ्ये कुटुंबियांचे गुहागर तालुक्यातील राजकीय वजन कमी करण्यासाठीच याठिकाणी निवडणूक होत असल्याची चर्चा संपूर्ण गुहागर तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी होणारी निवडणूक ही रंगतदार होणार असून नक्की कोण बाजी मारणार याच्या पैजा तळवली पंचक्रोशीसह संपूर्ण तालुक्यात लागल्या आहेत.
गुहागर तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास आघाडी, गावपॅनल मधून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, परंतु याला अपवाद ठरलेय ती अडूर ग्रामपंचायत. अडूर विकास आघाडी आणि शिवसेना यांच्यामधील तहाची बोलणी अचानक फिसकटल्याने येथे निवडणुक होणार आहे.
तसेच गुहागर तालुक्यातील प्रतिष्ठीत ठरलेली वेळणेश्वर ग्रामपंचायत ही 35 वर्षांनी बिनविरोध झाली आहे. त्यामुळे सर्व तालुक्यामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अडूरमधील कापले हे पूर्वी राष्ट्रवादीचे समर्थक होते. परंतु आज ते शिवसेनेत आहेत. त्यांनी गुहागर पंचायत समितीचे उपसभापतीपदही भुषविलेले आहे, त्यामुळे येथे शिवसेनेचे प्राबल्य असल्याचे चित्र आहे. अडूरमध्ये शिवसेनेच्या 3 जागा बिनविरोध आल्या आहेत. आता 8 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण अडूर पंचक्रोशीचे लक्ष लागून आहे.
गिमवी-देवघर या ग्रुप ग्रामपंचायतीत शिवसेना विरूध्द नाराज शिवसेना पुरस्कृत गावपॅनल अशी लढत होत असल्याने ही निवडणूक अतिशय अटीतटीची होणार आहे. गेली 5 वर्षे येथे शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. या ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्य असून ही ग्रामपंचायत दोन गावांत विभागली गेली आहे. सध्या या ठिकाणी ९ जागांसाठी तब्बल २२ उमेदवार रिंगणात आहेत. हे सर्व २२ उमेदवार शिवसेना आणि फक्त शिवसेना या पक्षाशी निगडीत असल्याने याठिकाणी होणारी निवडणूक ही शिवसेना विरूध्द शिवसेनेमध्ये नाराज असणारे कार्यकर्ते यांच्यात आहे.
तवसाळमध्ये जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष महेश नाटेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे तर राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस व राष्ट्रवादीच्या माजी सभापती संपदा गडदे हे सर्व तवसाळ विभागातील असून या सर्वांची राजकीय प्रतिष्ठा खऱ्या अर्थाने पणाला लागली आहे. याठिकाणी तिरंगी लढत असून तिनही पक्ष आपलेच सदस्य निवडून येणार असा दावा करीत आहेत. तिनही पक्षांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून कोणत्या पक्षाचा सरपंच विराजमान होणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे. मनसेसुध्दा या निवडणुकीत ताकदीनिशी मनसेसुध्दा या निवडणुकीत ताकदीनिशी उतरली आहे. मात्र, सर्वच ठिकाणचे वातावरण हे शांततापूर्ण पध्दतीने असून पोलिसांनी येथील प्रमुख गावांमध्ये परेड केली आहे. तालुक्यातील एकूण 29 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायती आतापर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. उर्वरित 16 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. मात्र, या 16 ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गढूळ वातावरण झालेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, काल बुधवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून दि. 14 जानेवारीला गुप्त प्रचारावर भर देण्यात येणार आहे.
- या सर्वच प्रमुख ग्रामपंचायतींवर पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे. या ठिकाणी पोलिसांचे पथक संचलन झाले असून या ठिकाणी शांततेत व सुरळीत मतदान पार पडेल, असे पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांनी सांगितले.