गुहागर- ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला गुहागर पोलिसांनी दमदार कामगिरी करत गोवा बनावटीचे विदेशी मद्य जप्त केल्याने एकच खळबळ माजली असुन तालुक्यात पोलीस पहारा कडक करण्यात आला आहे.
गुहागर पोलीस दलातील जिगरबाज कर्मचारी राजू कांबळे यांना मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीनंतर गुहागर पोलिसांनी बोऱ्या फाटा येथे सापळा रचत एका संशयित रिक्षाची तपासणी केली त्यावेळी रिक्षामध्ये 16,560 रुपये किंमतीच्या 5 डझन मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहे. सदर मद्य गोवा बनावटीचे आहे. यावेळी रिक्षा चालक नितेश दिनेश आरेकर यांच्यावर विना परवाना मद्याची वाहतूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुहागर पोलीस दलातील कर्मचारी राजू कांबळे यांना बोऱ्या फाटा परिसरात मद्याची वहातूक होत असल्याची माहिती मिळाली याचं माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव, हेडकॉन्स्टेबल आर. एल. कांबळे, संतोष साळसकर ,दोन पंचांसह बोऱ्या फाटा येथे सापळा रचला सायंकाळी 4 च्या सुमारास सुरळ मार्गे एक रिक्षा (क्र. एम एच 08 आर 9943) वेगाने येताना पोलिसांनी पाहिली. सदर रिक्षा थांबवून पोलीस तपासणी करत होते. त्यावेळी रिक्षामध्ये प्रवासी बसतात त्या आसनामागील डिकी मद्याचे खोके सापडले. त्यामध्ये मद्याचा 16,560 रुपये किंमतीच्या 60 बाटल्या सापडल्या. ही रिक्षा नितेश दिनेश आरेकर राहणार नरवण चालवीत होता.यावेळी पोलिसांनी विना परवाना वहातुकीसाठी वापरण्यात आलेली 40 हजार रुपये मूल्याची रिक्षा आणि 16,560 रुपये किंमतीचे मद्य असा एकूण 56,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नितेश आरेकर याच्यावर बेकायदा बिगर परवाना गोवा बनावटीची दारू विक्री व धंदा करण्याकरिता वाहतूक केल्याबद्दल दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुहागर पोलिसांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला ही कारवाई केल्याने पोलिसांच्या विशेष कौतुक होत आहे.