खेड -मुंबई गोवा महामार्गावरील भरणे, लवेल आणि लोटे या ठिकाणी सुरु असलेल्या ओव्हरब्रिजच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. ओव्हरब्रिजचे काम सुरु असलेल्या ठिकाणी तयार करण्यात आलेली पर्यायी मार्ग धोकादायक अवस्थेत असल्याने इथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. कशेडी ते पशुराम घाट या दरम्यानच्या ४३.८ किलोमिटरच्या रस्त्याच्या कामाचा ठेका कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने घेतला आहे. या दरम्यानचा अवघड भोस्ते घाट फोडून क्रांक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र मध्येच २०० मिटरचे काम राखून ठेवल्याने हे अंतर पार करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्या ठिकाणी ओव्हरब्रिजच्या कामांना सुरवात करण्यात आली आहे त्या ठिकाणचे पर्यायी मार्ग पक्के डांबराचे तयार करणे गरजेचे होते. तसे केले असते तर वाहतुकीची क्रेडीही झाली नसती आणि अपघातांचा धोकाही उरला नसता. मात्र ठेकेदार कंपनीने पर्यायी मार्गाचे डांबरीकरण न करता हे मार्ग दगड-मातीचे तयार केले आहेत. या कच्चा रस्त्यावरून अवजड वाहने जावून मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहने हाकताना चालकांच्या नाकीनऊ येऊ लागले आहेत.
भरणे नाका येथील परिस्थितीती तर दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे. भरणे येथील ओव्हरब्रिजचे काम गेली दोन वर्षे सुरु आहे. हे ठिकाण मार्केट प्लेस असल्याने इथे नेहमीच पादचारी, वाहनांची मोठी गर्दी असते, मुंबई गोवा महामार्गावरून धावणारी वाहने देखील इथूनच धावत असतात. त्यामुळे या ठिकाणी वन-वे वाहतुक सुरु ठेवणे आवश्यक होते. मुंबईकडे जाणारी वाहतुक दुकानांच्या बाजूने तर गोव्याकडे जाणारी वाहतुक पेट्रोलपंपाकडून वळविणे गरजेचे होते. मात्र दोन्ही बाजुची वाहतुक दुकाने असलेल्या बाजुनचे सुर ठेवण्यात आली असल्याने इथे दिवसभर वाहनांची कोंडी झालेली पहावयास मिळत आहे. खेडच्या पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की यांनी या ठिकाणचा अपघाताचा धोका ओळखून तीन ते चार कर्मचारी वाहतुक नियंत्रणासाठी तैनात केले आहेत. मात्र या महामार्गावर वाहनांची वर्दळच इतकी आहे की वाहतुकीला नियंत्रित करताना या चारही कर्मचाऱ्यांची तारांबळ होत आहे.
लोटे येथे ज्या ठिकाणी ओव्हरब्रिजचे काम सुरु आहे त्या ठिकाणीही मार्केट आहे. त्यामुळे इथेही मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. अपघातांचा धोका इथेही आहे, त्यामुळे संबधित ठेकेदार कंपनीने ज्या ज्या ठिकाणी ओव्हरब्रिजचे काम सुरु आहे त्या त्य ठिकाणच्या पर्याय मार्गाचे डांबरीकरण करावे अशी मागणी होत आहे.