गुहागर – सध्या गुहागर – विजापूर महामार्गाचे रुंदीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता या कामाला शृंगारतळी बाजारपेठेत सुरूवात झालेली आहे व तसे रुंदीकरणाचे सीमांकनही करण्यात आले असून हे सीमांकन काही व्यापाऱ्यांच्या दुकानांचे अनधिकृत बांधकाम छेदुन जात असल्या कारणामुळे येथील काही व्यापाऱ्यांचे धाबेच दणाणले आहेत.
शृंगारतळी बाजारपेठ ही गुहागर तालुक्याची मध्यवर्ती बाजारपेठ असून तालुक्याची आर्थिक राजधानी समजली जाते. या बाजारपेठेमध्ये सतत जनतेची व वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. दिवसागणिक धंद्यामध्ये वाढ होत गेल्याने येथील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांपुढे वाढीव बांधकाम करून जागा वाढविली. अगदी मुख्य रस्त्यापर्यंत हे व्यापारी पोहोचल्यामुळे बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची वाहने उभी करण्याचे फार मोठे आव्हान ठरते आहे. यामुळे बाजारपेठेमध्ये सतत वाहतुक कोंडीची समस्या उद्भवते. यावर ग्रामपंचायत व संबंधित खात्याने बरेच उपाय केले, पर्यायही शोधले परंतू यश आले नाही. मात्र आता रस्ता रूंदीकरणामध्ये व्यापाऱ्यांच्या या अनधिकृत वाढीव पडव्या तुटल्या जाणार असल्यामुळे त्यातील काही व्यापारी चिंताग्रस्त झालेले दिसून येते. ही अनधिकृत बांधकामे नो अपील ना मर्सी अशाच पध्दतीने तोडली जा जाणारआहेत. रस्त्याच्या दुतर्फा गटारे बांधण्यात येवून महावितरणची लाईनही जमिनीखालून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यालगत असणाऱ्या विजेचे ट्रान्सफॉर्मर व पोल उचललेले जाणारआहेत. यामुळे शृंगारतळी बाजारपेठेला एक नवा “लुक” प्राप्त होणार आहे. या साऱ्या बाबींनी जनता सुखावली असली तरी काही व्यापाऱ्यांचे चेहरे मात्र पडलेले दिसत आहेत.
एकंदर आताशी कामाला सुरूवात झालेली असून रस्त्यालगत असणाऱ्या टपऱ्या, लहान दुकाने उठवीली जाणार असल्यामुळे असे छोटे-छोटे व्यापारीही धास्तावले आहेत. त्यांना महामार्गाचे काम पूर्ण झाल्या नंतर पर्यायी जागा मिळावी अशी मागणीही होत आहे.
–—शृंगारतळी बाजारपेठ मधील पोलीस चॉकी उठणार.
शृंगारतळी बाजारपेठ मधील महामार्गालगत असणारी पोलीस चॉकी जरी या कामामध्ये जात असली तरी तिला पर्यायी जागा शोधून देणार असल्याचे पाटपन्हाळे ग्रामपंचायत चे सरपंच संजय पवार यांनी सांगितले.