खेड- मनावर बुद्धीची लगाम असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जेष्ठ ब्रह्माकुमारी संतोष दीदी यांनी येथे केले. गोवा येथे त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आल्यानंतर त्यांनी खेडमध्ये सदिच्छा भेट दिली. यावेळी खेड येथील प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय शाखे तर्फे त्यांचा जाहीर सत्कार व प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी तर्फे जेष्ठ ब्रह्माकुमारी संतोष दीदी याना दि ६ डिसेंबर २०२० रोजी गोवा येथे आयोजित कार्यक्रमात डॉक्टर ऑफ पीस ही पदवी प्रदान करण्यात आली. ब्रह्माकुमारी संतोष दीदी या प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबु राजस्थान तर्फे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा विभागाच्या प्रमुख आहेत. तसेच त्या ब्रह्माकुमारीज संस्थांच्या समाजकार्य विभागाच्या प्रमुख आहेत. ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी तर्फे मानद डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क प्रदान करण्यात आल्यानंतर दि ७ व ८ रोजी रत्नगिरी जिल्ह्यातील खेड येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी खेड शहरातील महाडनाका येथील लाईट हाऊस इमारतीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय कोल्हापूर व पुणे झोन प्रमुख ब्रह्माकुमारी सुनंदा दीदी, मुंबईतील सायन व माटुंगा सेवा केंद्र प्रमुख ब्रह्माकुमारी वंदना दीदी, गोवा व सिंधुदुर्ग विभाग प्रमुख ब्रह्माकुमारी शोभा बहन, हुपरी सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी सुनीता दीदी, खेड सेवा केंद्र संचालिका गीता बहन, नागेश तोडकरी, सखाराम कदम, सुरेश पवार, संदीप आंबरे व रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सेवा केंद्रातील ब्रह्माकुमारी संचालिका उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सवाकेंद्रातर्फे करण्यात आले. दीपप्रज्वलन झाल्यानंतर कुमारी सई हिने स्वागत नृत्य सादर केले. प्रस्ताविक ब्रह्माकुमारी गीता यांनी केले. विश्वविद्यालयाच्या कार्याची व रचनेची माहिती ब्रह्माकुमारी वंदना यांनी दिली. यावेळी ब्रह्माकुमारी संतोष दीदी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या, परमात्म्याचा शोध वृद्धपकाळात घेऊ असे सगळेच जण म्हणत असतात मात्र जीवन काळात परमात्म्या पर्यंत पोहोचण्याची विधी न शिकता व त्याचा अभ्यास न करता अंत समयी।त्याच्याबरोबर बुद्धियोग जोडता येत नाही व जीवन सम्पून जाते. लोक तक्रार करतात की परमात्म्या सोबत बुद्धी जोडली जात नाही याचे कारण त्याची परमात्म्याचा परिचय नाही, त्याच्यासोबत प्रेम नाही व त्याच्या सोबत बुद्धियोग जोडण्याची विधी देखील त्यांना माहिती नाही. जगात मानव मानवात प्रेम निर्माण होण्यासाठी त्यांची आत्मा ही खरी ओळख होणे गरजेचे आहे. केवळ आपण सगळे एकमेकांचे भाऊ आहोत असे म्हणून उपयोग नाही तर आपण खरेतर अविनाशी व एकसमान आत्मा असल्याने एकमेकांचे भाऊ आहोत हे समजून घेतल्या नंतरच बंधूभाव व आपसात प्रेम वाढू लागेल. स्वतःला देह समजून देशाभिमान बाळगू लागल्याने आपसातील प्रेम व बंधुभाव कमी झाला आहे. आत्मविस्मृतीच्या स्थितीतून आत्म स्मृतिकडे जाण्याची विधी स्वतः परमात्मा सर्व आत्म्यांना शिकवत आहेत. त्यासाठी या ईश्वरीय विश्व विद्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. देहाभिमानातून विकार निर्माण होत असून आत्मस्मृतीतून मानव देव समान बनतो. प्रत्येक आत्मा गुणांच्या आधारावर हिरा अथवा दगड ठरते. शरीराचा कोणताही अवयव विकारी असेल तर मानव तात्काळ उपचारासाठी वैद्यकडे धावतो मात्र आत्म्याचे मन व बुद्धी हे अवयव आज विकारी बनलेले असताना त्यावर उपाय करण्यासाठी प्रयत्न करत नाही. त्यामुळे मानवाच्या जीवनात दुःख, अंधश्रद्धा व अंधकार पसरला आहे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश आवश्यक असून ईश्वरीय ज्ञान जीवन जगण्याची कला शिकवत आहे. त्यामुळे प्रत्येकाने टाइम पास करण्यात अमूल्य वेळ खर्च न करता मानवी जीवनाचे व वेळेचे मूल्य जाणून ज्ञानार्जन व सेवेत ते खर्च करावे. कारण जो वेळेला नष्ट करतो एक दिवस वेळ त्याला नष्ट करते, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी संतोष दीदी यांनी केलं. यावेळी ब्रह्माकुमारी सुनंदा दीदी यांनी राजयोग परिचय अभ्यास उपस्थिताना करून दिला.