खेड – खेड तालुक्यात वाळू उत्खनन करण्यास बंदी असतानाही खेड मधील कर्दे खाडीपट्ट्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. महसूल यंत्रणेचा डोळा चुकवत हा उपसा केला उपसा केला जात असल्याचे चित्र भासवले जाते. मात्र, सुरू असलेला वाळू उपसा प्रशासनाला माहीत असूनही त्यावर कारवाई केली जात नसल्याचे समोर आले आहे.
खेड तालुक्यातील खाडी लागत सध्या मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने वाळू काढली जात आहे. परिणामी शासनाच्या महसुला सोबत पर्यावरणाची देखील हानी होत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कामगिरीबाबत लोकांची नाराजी व्यक्त होत आहे. कोणत्याही प्रकारची रॉयल्टी भरावी लागत नसल्यामुळे तालुक्यात वाळू माफिया वाळूचा उपसा करत आहेत. सध्या परवानगी नसल्यामुळे वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे अवैधरित्या वाळू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची संख्याही वाढली आहे.