चिपळूण- केंद्र शासनाकडून आलेल्या आदेशानुसार ३१ खनिजे गौण खनिज म्हणून अधिसूचित केलेल्या गौण खनिज यांना परवाने देणे बंद करण्यात आले होते, त्यामुळे कोकणात घरबांधणीसाठी अत्यावश्यक चिरा(जांभा )दगड (लॅटराईट स्टोन) खाणींना परवानगी देणे बंद झाले होते, मात्र आमदार शेखर निकम यांनी गेले महिनाभर सर्वांच्या सहकार्याने पाठपुरावा केल्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जांभा चिरेखाणींना परवानगी देण्याचा आदेश आज मंगळवारी महसूल विभागाकडून देण्यात आला.
खासदार सुनील तटकरे यांनी सुरुवातीपासूनच या विषयात लक्ष दिले. त्याचबरोबर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री आदिती तटकरे यांचेही आपल्याला यात मोठे सहकार्य लाभले, असे आ. निकम म्हणाले. त्याचबरोबर कोकणातील सर्वच आमदारांनी चिरा/जांभा दगड (लॅटराईट स्टोन) खाणींना पूर्वीप्रमाणे अल्पमुदतीचे परवाने द्यावे, यासाठी पाठपुरावा केल्याने यात मोठे यश आले आहे, असे आ. निकम यांनी ‘दिव्य रत्नागिरी’शी बोलताना सांगितले. पूर्वीप्रमाणे स्थानिक व्यक्तींसाठी जांभा/चिरा खाणींना आज परवानगी देण्यात आली. या दगडाचा वापर औद्योगिक प्रयोजनार्थ होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना चिरेखाणींना परवानगी देताना महसूल विभागाकडून करण्यात आली आहे.