पोलादपूर (शैलेश पालकर)- यंदा कोरोना संसर्ग पार्श्वभुमीवर कायदा आणि सुव्यवस्थेला प्रचंड मर्यादा आल्याचे पोलादपूर तालुक्यात पाहण्यास मिळत असून यावर्षी मे महिन्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या गुरूजींना मोकाट फिरण्याचे अभय प्राप्त झाले असून शनिवारी उघडकीस आलेल्या घटनेत खेड येथील मौलानाविरूध्द पोलादपूर पोलीसांनी पोक्सोचा गुन्हा दाखल केला असून त्याला पाच दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आल्याची अधिकृत माहिती प्राप्त झाली आहे. यानिमित्त पोलादपूर तालुक्यातील इतर घटनादेखील पोलीसांच्या रडावरवर आल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. मौलानाविरोधात अंधश्रध्दा निर्मूलन बुवाबाजी जादूटोणा विरोधी कायद्यानुसारही कारवाई होण्याची मागणी जोर धरत आहे.
पोलादपूर तालुक्यातील दूर्गम डोंगराळ घाटरस्ता भागातील एका शाळेतील गुरूजींनी त्यांच्याच समाजातील गरीब अल्पवयीन मुलीला मातृत्व लादल्याची घटना ‘चाय त्याची न्याय’ तत्वावर मिटल्यानंतर गुरूजींना सोशल मिडीया व्हायरल पत्रकारितेतून ‘कर्तव्य प्रतिष्ठा’ प्राप्त झाल्याची चर्चा जोरदार सुरू होती. त्या घटनेतील तडजोडी आणि त्यानंतर गुरूजींना मोकाट फिरण्यासह मिळालेले अभय पोक्सो गुन्ह्याची राखरांगोळी करणारे होते. मात्र, त्यानंतर गुरूजींना हवे त्याठिकाणी बदली मिळाल्याने त्या प्रकरणाच्या रफादफा होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पिडीत मुलींच्या पालकांची कोणतीही तक्रार नसल्याने पोलादपूर तालुक्यात काही पोक्सो गुन्ह्यांचा पचका झाल्याचे दिसून आले आहे.
शनिवार, दि. 7 नोव्हेंबररोजी एका अल्पवयीन मुलीला (वय 13 वर्षे) तिच्या आईने (वय 37वर्षे) महाड येथील एका जागरूक डॉक्टरकडे तपासणीसाठी नेले असता सदरची मुलगी चक्क आठ महिन्यांची गरोदर असल्याचे धक्कादायक सत्य निदर्शनास आल्यानंतर डॉक्टरांनी महाड शहर पोलीस ठाण्याला कळविले. मात्र, सदरची मुलगी पोलादपूर तालुक्यातील माटवण गावातील रहिवासी असल्याने सदरचे प्रकरण पोलादपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. या घटनेची फिर्याद पोलीस नाईक नटे यांनी घेतली आणि पोलीस उपनिरिक्षक एम.पी.लोणे यांनी तपासी अंमलदार म्हणून हाती घेतली.
पोलादपूर पोलीस ठाण्यात दाखल नोंदीनुसार सदर महिला माटवण मोहल्ल्यातील असून तिची अल्पवयीन मुलगी ही नेहमी आजारी पडत असे. कोणासही काहीही बोलून मारायलादेखील अंगावर धावून जात असे. यामुळे महिलेच्या पतीने खेड शहरातील एक मौलाना या आजारावर चांगला उपचार करतो असे सांगितले होते. यानुसार बगदा या भूत-प्रेत-पिशाच्च व अन्य प्रभावातून पिडीत व्यक्तीस बाहेर काढण्याच्या अनिष्ट प्रथेतून मौलाना (वय 34 वर्षे) याला सप्टेंबर 2019 मध्ये मोबाईलद्वारे संपर्क साधून बोलविण्यात आले. मौलानाने फिर्यादीच्या घरी सकाळी 10 वाजता येऊन अगरबत्तीचा धूर करून कोणतेतरी औषध पाण्यात मिसळून अल्पवयीन मुलीस पिण्यास दिले. पिडीत मुलगी 15 ते 20 मिनिटांनी शुध्दीवर आल्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत मौलानाने हा प्रकार 3 ते 4 वेळा केला. त्यानंतर मार्च 2020 मौलानाने घरी येऊन (तारीख वेळ नक्की माहिती नाही, असे फिर्यादी महिलेचे म्हणणे आहे.) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हिला पिडीत मुलीला बेडरूममध्ये आणण्यास सांगितले. यानंतर फिर्यादी महिलेला काही वस्तू आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवून पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्यावर बलात्कार करून तिला आठ महिन्यांची गर्भवती केले. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्यामते अशाप्रकारची बगदा करण्याची मान्यता नसून ही अंधश्रध्दा असून त्याविरोधातही गुन्हा दाखल केल्याखेरिज अशा वाईट कृत्यांवर कायद्याचा धाक बसणार नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील या मौलानाविरूध्द पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 51-2020 नुसार भा.दं.वि. 376, 376(2)(एफ)(के), 376(3), 328 बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा पोक्सो अधिनियम 2012च्या 3, 4,5,5(जे) (2), 5(पी),7,8,9(पी), 10 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याकामी पोलीस उपनिरिक्षक लोणे हे महाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे आणि सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री खेड शहरातील शिवाजीनगर परिसरातून अटक करून ताब्यात घेण्यात आले असून सदर मौलाना नामर्द असल्या कारणाने त्याची बायको त्याला सोडून गेली असल्याने त्याच्याकडून अशी घटना होऊ शकत नसल्याचा समज पसरविण्यात आला तरीही या संदर्भात समाजातील कोणीही मौलानाचे समर्थन करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मौलानाच्या नपुंसकतेच्या चर्चेमुळे त्याची डीएनए चाचणी करण्यात येणार असून अल्पवयीन मुलीच्या गर्भाशी डीएनए जुळल्यास त्याच्यावरील कायद्याचा पाश अधिकच घट्ट होणार आहे. पोलादपूर पोलीसांनी सदर आरोपी मौलानाला ताब्यात घेऊन अटक करीत न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. या काळात त्याच्या रक्ताचे नमूने घेऊन मुलीच्या गर्भाशयातील भ्रूणाचेही नमूने घेऊन डीएनए टेस्ट जुळण्यासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
यंदाच्या 2020 सालातील पोलादपूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला मातृत्व प्रदान करण्याच्या या दुसऱ्या घटनेत मौलानाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या आधीच्या बहुचर्चित घटनेतील गुरूजी पोलादपूर शहर व तालुक्यात मोकाटपणे फिरत असून त्याची प्रतिमा उजळ करण्यासाठी सोशल मिडीयावरील कथित पत्रकार प्रतिष्ठा देण्याचे ‘कर्तव्य’ पार पाडत असल्याचे उघडपणे दिसत आहे. गुरूजींना हवे त्या ठिकाणी बदली देण्यात आली असून काही समाजधुरिणांनी अल्पवयीन मुलीच्या बाळंतपणात सरकारी यंत्रणेलाही गोवल्याने गुरूजींचे ते प्रकरण कायद्याच्या मजबूत पाशापासून दूर ठेवण्यात येत आहे. मात्र, सद्यस्थितीत अल्पवयीन कुमारी माता प्रकरणातील पाच महिन्यांच्या बालिकेच्या ‘डीएनए’शी गुरूजींच्या डीएनएची सांगड घालण्यासाठी पोलादपूर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल नसल्याने गुरूजी मोकाट फिरत आहेत. ज्या प्रकरणात अल्पवयीन पिडीत मुलींच्या पालकांकडून तक्रार दाखल होत नसेल, अशा ठिकाणी पोलीसांनीच तक्रार देण्याची कायद्यात तरतूद होण्याची मागणी होत असून जुगार व अन्य धाडींवेळी पोलीसच फिर्यादी असल्याचा हवालाही काही तज्ज्ञांनी यावेळी दिला आहे. मौलानाच्या या अमानुष लैंगिक कृत्यामुळे पोलादपूर तालुक्यातील अन्य घटनादेखील पोलीसांच्या रडारवर आल्या असून या सर्व घटनांतील संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.