गुहागर (विशेष प्रतिनिधी )- गुहागर तालुक्यातील पडवे येथे राष्टीय पेयजल योजनेअंतर्गत १ कोटी ८० लाख रुपये अंदाजपत्रकीय पाणी योजना मंजूर होऊन अनेक वर्षे झाली तरी मात्र आजपर्यंत ही पाणी योजना पूर्णत्वास गेलेली नाही .ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे ही योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. ही योजना अद्याप पूर्ण न झाल्याने या ठिकाणच्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत या योजनेचे स्ट्रक्चरल ऑडिट व काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदारास कोणत्याही प्रकारचे बिल अदा करण्यात येऊ नयेत, अशी मागणी गजानन गडदे, सुभाष कोळवनकर ,सुजेंद्र सुर्वे,महेश गडदे यांनी केली आहे.
गुहागर तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई भेडसावणारे गाव म्हणजे पडवे. कायमस्वरूपी असणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार सन १०१४/ १५ मध्ये पेयजल योजनेअंतर्गत १ कोटी ८० लाख रुपये अंदाजपत्रके पाणी योजना मंजूर झाली. मात्र, विविध कारणांमुळे ही पाणी योजना आजपर्यंत पूर्णत्वास आली नाही. पाणी योजनेचे काम मिळाल्यानंतर ठेकेदाराने अतिशय धीम्या गतीने कामास सुरुवात केली. कालांतराने ठेकेदार नियोजित जागी काम करत नसल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. योजनेच्या विहिरी करता सर्वे नंबर २०/१३ या क्षेत्रांमध्ये बक्षीसपत्र जि. प. च्या नावे होऊन तशी सातबारा सदरी नोंद असताना विहिरीची बांधणी सर्वे नंबर २०/१४ मध्ये करण्यात आली. विहिरी नजिक बांधलेला बंधारा चुकीच्या ठिकाणी बांधल्यामुळे बंधाऱ्याच्या बाजूचा भाग धुपून जाऊन शेतजमिनीचे नुकसान झाले. हे काम करत असताना काताळे गावाच्या हद्दीतील प्राचीन सोमनाथ मंदिराच्या कंपाउंडची नासधूस झाली आहे.
गुहागर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग गुहागर यांना पत्रव्यवहार करून या योजनेचे इस्टीमेंट, प्रशासकीय मान्यतेचे पत्र, मंजूर रक्कम, कार्यारंभ आदेश, पाण्याचे इलटेस्ट रिपोर्ट, सुधारित मान्यता या बाबत विचारणा केली असता सदरची माहिती माहितीच्या अधिकारात मागून घ्या अशी उद्धट उत्तरे ग्रामस्थांना मिळाली. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी चाललेल्या मनमानी कारभाराबाबत ग्रामस्थांनी गेले वर्षभर संबंधितांकडे पत्र व्यवहार केला. त्यानुसार अधिकाऱ्यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मात्र अद्याप ही त्या ठिकाणी कोणतेही काम सुरू न झाल्याने अधिकारी व ठेकेदार यांच्यात साटेलोटे झाली असल्याची चर्चा सुरू आहे.