राज्य सरकारचा निर्णय; १ ऑगस्ट 2021 पासून १५ वर्ष जुन्या रिक्षा चालवण्यास बंदी

0
127
बातम्या शेअर करा


मुंबई – महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाने राज्यात रिक्षांची वयोमर्यांदा १५ वर्षे करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही वयोमर्यादा यापूर्वी २० वर्षे होती. ही वयोमर्यादा मुंबई एमएमआर परिसरात २० वर्षांवरून १५ वर्षांवर आणण्यात आली असून ती इतर भागांमध्ये टॅक्सींप्रमाणे करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मुंबई एमएमआर परिसरात नव्या निर्णयानुसार १ ऑगस्ट २०२१ पासून १५ वर्षांपेक्षा जुन्या रिक्षा चालवण्यास बंदी असेल. तर उर्वरित महाराष्ट्रात १ ऑगस्ट २०२४ पासून हा निर्णय लागू होणार आहे. राज्यात २०१३ पूर्वी टॅक्सींसाठी वयोमर्यादेचे बंधन घालण्यात आले असले तरी रिक्षांसाठी मात्र बंधन नव्हते.

सप्टेंबर मध्ये पार पडलेल्या बैठकीदरम्यान मंजूरी देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. राज्य परिवहन विभागाने हा निर्णय माजी आयएएस अधिकारी बी.सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसींच्या आधारावर घेतला. खटुआ समितीने २०१७ मध्ये महाराष्ट्र सरकारला यासंदर्भातील आपला अहवाल सोपवला होता. त्यापैकी रिक्षांची वयोमर्यादा कमी करण्यासह अनेक महत्त्वाच्या शिफारसी स्वीकारण्यात आल्या आहेत.

सध्या १० लाखांपेक्षा अधिक रिक्षा राज्यातील रस्त्यांवर धावत आहेत. यापूर्वी हकीम समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारावर १ ऑगस्ट २०१३ पासून राज्य परिवहन विभागाने रिक्षा आणि टॅक्सींची वयोमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यापूर्वी राज्यात रिक्षांसाठी कोणत्याही वयोमर्यादेचे बंधन नव्हते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here