चिपळूण– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शासनाने हाती घेतलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाला गावोगावी सुरुवात झाली आहे. या फिरतीच्या कामासाठी ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी व संगणक परिचालकांना जुंपण्याचा प्रकार काही गावांमध्ये घडून आला आहे. काही परिचालकांनी सहकार्याच्या भावनेने या अभियानाला मदत केली आहे, मात्र, त्यांच्यावरच या कामाचा अधिक भार टाकण्यात येत असल्याने काहींनी याला नकार दिला आहे तर काहींचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबर खटके उडताना दिसत आहेत.
या अभियानात आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्यसेविका यांना सहभागी करुन घेण्यात आलेले असले तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अगोदरच हात झटकल्याने या अभियानाच्या फिरतीची जबाबदारी केवळ आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका यांच्यावर येऊन ठेपली. त्यामुळे हे अभियान राबविताना विलंब झाला. अशावेळी काही ग्रामपंचायतींनी आपले कर्मचारी देण्याचा निर्णय घेतला. वास्तविक या अभियानात स्थानिक स्वयंसेवकांना सामावून घेण्याचा नियम आहे. दिवसाला 150 रुपये मानधन अशा तत्वावर हे अभियान चालविले जात आहे.
या अभियानात ग्रामपंचायतींच्या संगणक परिचालकांची भूमिका महत्वाची ठरली आहे. प्रत्येक संगणक परिचालकांवर दोन ते चार ग्रामपंचायतींच्या कामांचा भार आहे. अनेक आँनलाईनची कामे त्यांना नियमित करावी लागतात. वेळेवर झाली नाही तर पंचायत समिती प्रशासन संबंधीत ग्रामसेवकांना जबाबदार ठरतात व ग्रामसेवक संगणक परिचालकांवर दबाव टाकतात. त्यामुळे ही कामे वेळेत करावी लागतात. अशातच संगणक परिचालकांना गेले 3 महिने मानधनच मिळालेले नाही. असे असले तरी काही संगणक परिचालकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या शब्दावर सहकार्याच्या भावनेने या अभियानातील कर्मचाऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. या अभियानात घरोघरी जाऊन संबंधित कुटुंबातील माणसांची आँक्सिजनची पातळी, तापमान तपासणे, त्यांची नोंद करणे, त्यांना सल्ला देणे अशी कामे आहेत. काही आशा स्वयंसेविकांना व आरोग्य सेविकांना हे काम जमत नसल्याने त्या संगणक परिचालकांना हे काम करण्यास भाग पाडतात. त्यातच झालेली कामे ही आँनलाईन करण्याची जबाबदारीही अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर टाकण्याचा प्रकार सुरु असल्याने संगणक परिचालक व पथकातील कर्मचाऱ्यांबरोबर अंतर्गत खटके उडत असल्याचे दिसून आले आहे व यातून कामासाठी नकार देण्याचे प्रकार त्यांच्याकडून होत आहेत.
संघटनेला न सांगताच अभियानात सहभागी काही संगणक परिचालकांनी सहकार्याच्या भावनेने या अभियानात उतरण्याचा निर्णय स्वतः घेतला. मात्र, त्यांनी संघटनेला याबाबत सांगितलेले नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जशी जबाबदारी झटकली तशी संगणक परिचालकांनी संघटनेला सांगून झटकली असती तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती, अशी प्रतिक्रिया परिचालक संघटनेच्या काही सदस्यांनी व्यक्त केली आहे.