गुहागर -विजापूर रुंदीकरणात पुलांची कामे सर्वप्रथम करा -प्रकाश साळवी

0
234
बातम्या शेअर करा

गुहागर -गुहागर-विजापूर महामार्ग रुंदीकरणात चिपळूण ते मार्गताम्हाने या दरम्यान, रस्ता रुंदीकरणाला सुरुवात होण्यापूर्वी सर्वप्रथम पुलांची कामे हाती घ्या. तसेच रुंदीकरणात ज्यांची घरे, व्यवसायिक गाळे जात आहेत त्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मार्गताम्हाने पंचक्रोशीचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश साळवी यांनी केली आहे. याबाबत ते संबंधित अभियंता व ठेकेदाराची भेट घेऊन आपली व्यथा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या रुंदीकरणात मार्गताम्हाने ते शृंगारतळी दरम्यान, गेल्यावर्षी ठेकेदाराने पुलांची व लहान-मोठ्या नाल्यांची कामे सर्वप्रथम हाती न घेता रस्ता करुन रुंदीकरणाला सुरुवात केली. आजही या पुलांची बांधकामे अर्धवट असल्याचे दिसून येत आहेत. शृंगारतळी ते गुहागरला जोडणाऱ्या मोडकाघर पुलाची अवस्था आज कशी झाली आहे व त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांचे कसे हाल होत आहेत हे संपूर्ण तालुकावासियांना माहित आहे. रस्ता रुंदीकरणाला हात घालण्यापूर्वी मोडकाघर पुलाचे बांधकाम सर्वप्रथम हाती घेतले असते तर आज गुहागरला जाण्यासाठी वळसा मारण्याची वेळ आली नसती, असेही साळवी यांनी स्पष्ट केले आहे. आता चिपळूण ते मार्गताम्हाने दरम्यान दिवाळीनंतर रस्ता रुंदीकरणाला सुरुवात होणार असल्याचे समजते. या दरम्यान, मोठे पूल आहेत. यामध्ये मार्गताम्हानेत दोन पूल, तांबी जलाशयावरील पूल, त्यापुढे लहान-मोठे नाले आहेत. अशा पूल व नाल्यांची कामे ठेकेदाराने सर्वप्रथम हाती घ्यावीत व मगच रस्ता रुंदीकरणाला सुरुवात करावी, अशी आग्रही मागणी साळवी यांनी केली आहे.
या रुंदीकरणात रस्त्याच्या दोनही बाजूने व्यवसायिकांचे गाळे, दुकाने, टपऱ्या व घरे आहेत. विशेषतः मार्गताम्हाने बाजारपेठेत घरे व दोनही बाजूने दुकाने आहेत. रामपूर येथेही अशीच स्थिती आहे. या दोनही गावांची बाजारपेठ रस्त्यावर असल्याने रुंदीकरणात त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पक्की घरेही असल्याने त्यांचे मालक रुंदीकरणात उध्वस्त होणार आहेत. तरी त्यांना नुकसाईभरपाई मिळावी, अशी मागणी साळवी यांनी केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here