गुहागर– कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर गेले 6 महिने लाँकडाऊन असल्याने कोकणच्या पर्यटनाला जणू उतरती कळा लागलेली दिसून येत आहे. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेले लहान-मोठे व्यवसायिक, हाँटेल, लाँजधारक, एमटीडीसीचे अधिकृत एजंट या सर्वांवरच आता उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे. नेहमी गजबजलेले पर्यटकांचे माहेरघर कोकण पर्यटकांविना अजूनही पोरकेच राहिलेले दिसून येत असून जागतिक पर्यटन दिनाच्यानिमित्ताने हे अधोरेखित होत आहे. ढासळलेल्या या कोकणच्या पर्यटनाला उभारी देण्यासाठी शासनाने व्यवसायिकांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.
कोकणचे पर्यटन हे नेहमीच गजबजलेले ठरलेले आहे. अगदी नववर्षाच्या स्वागतापासून सुरुवात झालेले पर्यटन दिवाळीपर्यंत हाऊसफुल्ल असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांची कोकणात गर्दी उसळते. बाहेरुन येणारा पर्यटक हा प्रथम कोकणच्या पर्यटनाला पसंती देतो. कोकणच्या सौंदर्याची ही भुरळ नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. पुरातन स्थळे, देवतांची मंदिरे, किल्ले, गुंफा, लेणी पर्यटकांना पर्वणीच ठरलेली असतात. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे तर पर्यटकांच्या नेहमीच पसंतीत उतरलेले दिसून येतात. नववर्षाचे स्वागत हे कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवरुनच होते. अशा या पर्यटनावर कोरोना आपत्तीचे संकटच कोसळले. यावर्षी कोकणच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. मार्चपासून लाँकडाऊन जाहिर झाल्यानंतर सर्व पर्यटन हंगाम वाया गेले आहेत.
कोकणात उद्योगधंदे कमी प्रमाणात आहेत. सागरी किनारपट्टीचे बहुतांश तालुके व तेथील व्यवसाय हे पर्यटनावरच अवलंबून आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागरसारखे हे सागर किनारचे तालुके पर्यटन व्यवसायावरच आपले अस्तित्व टिकवून आहेत. कोकणी मेव्याच्या पदार्थांची होणारी पर्यटकांकडून होणारी खरेदी, चविष्ट मांसाहारी, शाकाहरी जेवण हे सर्वकाही पर्यटकांना चाखायला मिळतात ते कोकण पर्यटनातच. केवळ अशा व्यवसायांवरच येथील लहान-मोठे व्यवसायिक आपला उदरनिर्वाह करीत आलेले आहेत. हाँटेल, लाँज नेहमीच हाऊसफुल्ल असतात. विशेष म्हणजे कोकणात पर्यटन विकास महामंडळाची न्याहरी व निवास योजना लहान व्यवसायिकांना वरदानच ठरलेली आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात राहण्याची उत्तम सोय या योजनेअंतर्गत चालविली जाते. घरगुतीपध्दतीचे जेवण, राहण्यासाठी स्वतंत्र खोली अशी व्यवस्था योजनाधारकांना मोठा आर्थिक दिलासा देणारी ठरली असली तरी पर्यटकांसाठी ही मोठी पर्वणीच असते. त्यामुळे एक-दोन दिवस मुक्कामाला येणारा पर्यटक येथील घरगुती पध्दतीचे होणारे आदरातिथ्य पाहून इतका भारावतो की, तो येथील आपला मुक्काम वाढविताना दिसतो.
कोरोना आपत्तीत असे योजनाधारक मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले दिसून येत आहेत. ही योजना चालविण्यासाठीअनेकांन निवासस्थाने उभारली. यासाठी कर्जे काढली व या व्यवसायावर आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला. आज मात्र, हे योजनाधारकच आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत.
यावर्षीचा पर्यटन हंगाम पुरता वाया गेलेला दिसून येत आहे. मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या लाँकडाऊनमध्ये पूर्णतः पर्यटन कोलमडले. उन्हाळा पूर्णतः कोरडा गेला. सांस्कृतिक महोत्सव, खाद्य महोत्सव, कोकणी लोककलेचे दर्शन यावेळी घडून आलेले नाही. त्यामुळे यावर अवलंबून असणारा व्यवसायिक, कला सादर करणारे कलाकार यांच्यावरही आर्थिक आपत्ती ओढवली. दिवसेंदिवस कोरोना आपत्ती वाढतच चालली आहे तसे लाँकडाऊनही सुरुच आहे. दोन महिन्यांवर दिवाळी सण येऊन ठेपलेला आहे. दिवाळीच्या सुटीत दरवर्षी पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांवर कोरोनाची ही टांगती तलवार असणारच आहे व यापुढेही कोरोना आपत्ती आटोक्यात न आल्यास पर्यटनाचा मुख्य हंगाम असलेल्या गुलाबी थंडीतील नाताळ सण, थर्डी फस्ट असे पर्यटकांचे मौजमजेचे पर्यटनही कोरडेच जाण्याची शक्यता आहे.
देवस्थानेही आर्थिक संकटात
कोकणची पुरातन देवस्थाने हे पर्यटकांना निसर्गसौंदर्याइतकीच भावतात. येथे येणारा पर्यटक देवस्थाने, पुरातन स्थळांना भेटी देतोच. मात्र, आज कोरोना आपत्तीच्या लाँकडाऊनमध्ये देवस्थान कुलूपबंदच आहेत. भक्तनिवासांनाही याचा मोठा फटका बसला आहे. देवस्थान संस्थांना कोणतेही उत्पन्न नाही. संपूर्ण पर्यटनावरच ही अवकळा आल्याने या सर्वांवर आर्थिक मंदीची कुऱ्हाड कोसळलेली दिसून येत आहे.