चिपळूण -चिपळूण येथील ज्येष्ठ पत्रकार दैनिक पुढारीचे ब्युरोचीफ प्रमोद पेडणेकर यांचे आज सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्यांना अन्ननलिकेचा त्रास होत होता. काल रविवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली होती. आज सोमवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने चिपळूण शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
‘सामना’या दैनिकातून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. यानंतर गेली अनेक वर्षे ते चिपळूण येथे दैनिक ‘पुढारी’मध्ये सेवेत होते. समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांचा गाढा अभ्यास होता. वर्तमानपत्रात स्पेशल रिपोर्ट लिहिण्याची त्यांची खासियत होती. बेधडक पत्रकारिता करताना त्यांच्यावर अनेकवेळा हल्लेही झाले. सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही त्यांनी खूप मोठे काम उभे केले आहे.