गुहागर -गुहागर तालुक्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवताना प्राथमिक आरोग्य यंत्रणाही कोरोनाच्या विळख्यात आली आहे. गेले पाच महिने यावर नियंत्रण करणाऱ्यांपैकी ८० टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने आता याची जबाबदारी इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गुहागर तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 223 वर पोहचली आहे. यामध्ये चार जणांचा मुत्यु झाला आहे. १३० जण बरे होऊन घरी परतले आहेत. परंतु अजून ८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. वेळणेश्वर कोविड सेंटरमध्ये २६, घरामध्येच आयसोलेट केलेले ४९. रत्नागिरी येथे ५ जण उपचार घेत आहेत. पुणे येथे २, तर कराड व चिपळूण-कामथे येथे प्रत्येकी एकजण उपचार घेत आहेत. यामध्ये पुर्वीची कोरोना प्रादुर्भावाची तपासणी व पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्यानंतर तेथील भागात सर्व्हे करणारे स्टाप कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. सध्या गुहागर तालुका आरोग्य कार्यालयाला निर्जतुक करण्यात आले आहे. कार्यालयात केवळ दोघांचाच स्टाफ राहिला आहे. यामुळे आता कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जांगीड यांच्याकडे कोरोना रुग्ण सापडल्यानंतरची सर्व जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर कराड येथे उपचार सुरु आहेत. वैद्यकीय विभागातील प्रमुखावर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यावर पुणे येथे उपचार सुरु आहेत.
दररोजची रुग्णांची माहिती संकलन करून अहवाल देणारे कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. केवळ त्या टीममधील दोघेजण निगेटिव्ह आहेत. याचवेळी तालुका कार्यालयातील संगणक बंद पडले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेचे नियोजन नव्याने करावे लागणार आहे. डॉ. जांगिड यांनी यापुर्वी तालुका आरोग्य अधिकारी पद सांभाळले होते. परंतु त्यांना त्यांच्यासोबत रुग्णांच्या परिसरातील सर्व्हे करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ लागणार आहे. यापुर्वी तालुक्यात एखादं दुसरा रुग्ण होता त्यावेळी आरोग्य यंत्रणेची मोठी टीम कार्यरत होती, परंतु आता त्या टीमपैकी बहुतांशी कोरोना योध्दे म्हणून काम करताना प्रादुर्भावाला सामोरे जावे लागले आहे.