गुहागर – गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक स्वतंत्र रुग्णालय आहे. तसेच निरामय हे रुग्णालय पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. आरजीपीपीएल, एनटीपीसी, केएलपीएल, तसेच गेल या कंपन्यांद्वारे सीएसआर फंडातून या रुग्णालयाची सुधारणा व स्वच्छता केल्यास उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वतंत्र आरोग्य व्यवस्था निर्माण होईल, असे भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी सांगितले. दरम्यान, अंजनवेल येथे युसूफ मेहेर अली सेंटरद्वारे चालविले जाणारे रुग्णालय इमारतीसह उपलब्ध आहे. दोन कि. मी.च्या परिघामध्ये वरील ३ रुग्णालये आहेत. ही रुग्णालये एकत्रित केल्यास या आरोग्य यंत्रणांचा उपयोग उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या कोविड-१९ अंतर्गत आरोग्य व्यवस्थेसाठी करता येईल. तरी या कामासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात, अशा आशयाचे निवेदन डॉ. विनय नातू यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद प्रधान व सुरेश प्रभू यांना दिले आहे.