![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/08/20200823_193853-1024x1024.jpg)
चिपळूण – चिपळूण तालुक्यातील खडपोली औद्योगिक वसाहतीत निकृष्ट दर्जाचा अंगणवाडीचा पोषण आहार अत्यंत खराब व नियमबाह्यपणे आढळून आला होता. अद्यापही या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असून या गैरकारभाराची सखोल चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशा मागणीचे निवेदन भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डाँ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे केले आहे.
खडपोली औद्योगिक वसाहतीत निकृष्ट दर्जाचा अंगणवाडीचा पोषण आहार आढळून आल्यावर तेथे कोणताही परवानगी न घेता सकेलेले काम लक्षात आले होते. अन्न भेसळ खात्याचीसुध्दा परवानगी नव्हती. तेथील शिल्लक माल नष्ट केला गेला होता. महाराष्ट्र स्टेट को.आँ. कन्झुमर्स फेडरेशनमार्फत पुरवठा होणारा अंगणवाड्यांचा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा होता. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी फेडरेशन सोबत दि. 17 जुलै 2020 रोजी करारनामा केला व आजपर्यंत कधीही उन्हाळी सुट्टीच्या काळात मुलांना पोषण आहार दिला गेला नव्हता. यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर शाळा सुरु झालेल्या नाहीत असे असताना शिक्षण संचालकांनी दि. 3 आँगस्ट 2020 रोजी व्हीडीओ काँन्फरन्सद्वारे बैठक घेतली. त्यावेळी शाळास्तरावर शिल्लक असणारे धान्य व धान्यादी माल आदी वस्तू विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करावे असे सांगितले. प्रत्यक्षात मार्च 2020 कोरोना काळानंतर शिल्लक असणारा धान्यसाठा एप्रिल, मे मध्ये वितरीत करण्यात आलेला होता.
जून 2020 पासून शाळा सुरु न झाल्याने धान्यसाठा दि. 3 आँगस्ट 2020 रोजी शाळांमध्ये नव्हताच. असे असताना दि. 17 आँगस्ट 2020 रोजी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी पोषण आहार वाटपाबाबत पत्र काढले व निकृष्ट प्रकाराची मूगडाळ व हरभरा दगडमातीयुक्त कडधान्य प्रत्येक शाळेमध्ये पाठवले आहे. शाळा बंद तसेच अनेक ठिकाणी संचारबंदी असताना याप्रकारे शिक्षण खात्यामधील निधीचा अपव्यय करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या नावावर अन्य दलालांचे भले करण्याचा हा प्रयत्न आहे. जे गोडावून प्लाँट नं.44 खडपोली एमआयडीसी येथे सील केले तेथेच संबंधितांवर गुन्हे दाखल केले. त्याच ठिकाणी खराब मालाचे पँकिंग 16 आँगस्ट रोजी करुन हा माल शाळांच्या माथी मारला जात आहे. या सर्व गैरकारभाराची चौकशी करावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत तसेच निकृष्ट धान्याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती डाँ. नातू यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
स्वतंत्र आरोग्य यंत्रणा निर्माण करावी
गुहागर येथील रत्नागिरी गँस प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक स्वतंत्र रुग्णालय आहे. तसेच निरामय हे रुग्णालय पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. आरजीपीपीएल, एनटीपीसी, केएलपीएल, गेल या कंपन्यांद्वारे सीएसआर फंडातून या रुग्णालयाची सुधारणा व स्वच्छता केल्यास उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वतंत्र आरोग्य व्यवस्था निर्माण होईल. तसेच अंजनवेल येथे युसूफ मेहेर अली सेंटरद्वारे चालविले जाणारे रुग्णालय इमारतीसह उपलब्ध आहे. 2 कि.मी.च्या परीघामध्ये वरील 3 रुग्णालये आहेत. ही रुग्णालये एकत्रीत केल्यास या आरोग्य यंत्रणांचा उपयोग रत्नागिरी जिल्ह्याच्या कोवीड-19 अंतर्गत आरोग्य व्यवस्थेसाठी करता येईल. तरी या कामासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात, अशा आशयाचे निवेदन डाँ. विनय नातू यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद प्रधान व सुरेश प्रभू यांना दिले आहे.