चिपळूण – चिपळूण तालुक्यातील सर्वात मोठी आणि नावाजलेली ग्रामपंचायत म्हणून खेर्डी ग्रामपंचायत ओळखले जाते. याच ग्रामपंचायतीमध्ये गेली अनेक वर्ष आपले वर्चस्व राखून असणारे जयंद्रथ खताते आणि आप्पा दाभोळकर यांचा खेर्डी नळपाणी योजनेवरून वाद सुरू आहे. खेर्डी नळपाणी योजनेचे काम करताना खोटी कागदपत्रे करून व विश्वासात न घेता आपल्या जागेत खोदकाम व नुकसान करण्यात आल्याची तक्रार आप्पा दाभोळकर यांनी पोलिस स्थानकात केली होती.
या पार्श्वभूमीवर खेर्डी पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष जयंद्रथ खताते, तत्कालीन सरपंच जयश्री खाताते, जीवन प्राधिकरण विभागाचे दोन अभियंता व ठेकेदार यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज आज फेटाळला आहे, अशी माहिती तक्रारदार आप्पा दाभोळकर यांनी दिली. त्यामुळे खेर्डी येथील राजकारणाला वेगळा रंग चढला असून आता पुढे काय होणार ?याची चर्चा खेर्डीतील नाक्यानाक्यावर रंगू लागल्या आहेत.