480

गुहागर – ( यश घोणसेपाटील )- गुहागर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी प्रवीण रणदिवे यांची नियुक्ती करण्यात आली असून, विद्यमान पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांची रायगड येथे बदली झाली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये कामाचा अनुभव घेतलेल्या रणदिवे यांच्या नियुक्तीमुळे गुहागरमधील पोलीस प्रशासनाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली आहे.
प्रवीण रणदिवे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) २०१० मधील परीक्षेच्या माध्यमातून ते पोलीस उपनिरीक्षक पदावर सेवेत दाखल झाले. पोलीस दलातील आपल्या कारकिर्दीत त्यांनी विविध ठिकाणी जबाबदाऱ्या सांभाळत प्रशासकीय कामाचा अनुभव मिळवला आहे. रणदिवे यांच्या सेवाप्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी अजित पवार यांचे प्रमुख सुरक्षा रक्षक म्हणून तब्बल चार ते पाच वर्षे काम केले. या जबाबदारीनंतर त्यांनी रायगड, सोलापूर, पुणे आणि पुणे ग्रामीण या ठिकाणी पोलीस सेवेत काम केले. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांतील अनुभवामुळे त्यांच्या सेवाप्रवासात विविध प्रकारच्या जबाबदाऱ्यांचा समावेश झाला आहे. रणदिवे हे गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतूक शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. वाहतूक व्यवस्थापनाचा अनुभव घेतल्यानंतर आता त्यांच्याकडे गुहागर पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गुहागर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, गुन्हेगारीला आळा घालणे आणि नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ करणे, अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या नव्या पोलीस निरीक्षकांसमोर असतील. सातारा येथून सुरू झालेला पोलीस सेवेचा प्रवास, अजित पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पाच वर्षांचा अनुभव आणि विविध जिल्ह्यांतील कामकाजाची पार्श्वभूमी घेऊन प्रवीण रणदिवे आता गुहागरमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या कार्यकाळात गुहागरमधील कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या पोलीस प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here