खेड- रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली खाजगी कोरोना चाचणी प्रयोगशाळा खेड तालुक्यातील लवेल येथील रतनबाई घरडा हॉस्पिटल यांनी घरडा हॉस्पिटल, लवेल या ठिकाणी अँटीजेन तपासणी लॅबसाठीची परवानगी शासनाकडून घेऊन सुरु केली. त्याचे खेड तालुक्याचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांच्याहस्ते लॅबचे उदघाटन झाले. या वेळी खेडचे गटविकास अधिकारी रघुनाथ पारशे, घरडा कंपनीचे साईट हेड रामकृष्ण कुलकर्णी, एच. आर. विभागाचे अनिल भोसले, खेड तालुक्याचे नोडल अधिकारी डॉ. चेतन कदम आदी उपस्थित होते. या खाजगी कोरोना चाचणी प्रयोगशाळामुळे आता जिल्ह्यातील अनेकांना उपयोग होणार आहे.
या खासगी टेस्ट लॅबमुळे कोरोनाबाधिताचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे सुलभ होणार आहे.
गेल्या काही दिवसात जिल्ह्यामध्ये कोरोनाने कहर केला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र तरीही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतेच आहे. एखाद्या व्यक्तिला कोरोनाची लागण झाली आहे हे जितक्या लवकर कळेल तितक्या लवकर त्याच्यावर उपचार सुरु करता येणार आहेत. परिणामी कोरोनाचा वाढता प्रादर्भाव रोखणे शक्य होणार असल्याने लवेल येथील रतनबाई घरडा रुग्णालयात खासगी अँटीजेन टेस्ट लॅबला परवानगी मिळावी अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती. शासनाने या लॅबला मान्यता दिली आहे.
