गुहागर – गुहागर तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांमध्ये विपुल कदम यांच्याकडून नवरात्रीचे नऊ दिवस नवदुर्गाचे दर्शन घेण्यासाठी ४० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. या सेवेचा लाभ गुहागर तालुक्यातील सुमारे २ हजारपेक्षा जास्त महिलांनी घेतला.
गुहागर विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे विपुल कदम यांनी आपला जनसंपर्क सुरूच ठेवला आहे. तालुक्यातील जनतेच्या समस्या, रखडलेली विकास कामे यांचा आढावा कदम यांच्याकडून घेतला जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यात सदस्य नोंदणीलाही सुरुवात केली आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विपुल कदम यांनी नवदुर्गा दर्शन हा सेवाभावी उपक्रम राबवला आहे. आतापर्यंत तालुक्यातील सुमारे २ हजारपेक्षा जास्त महिलांनी या संधीचा लाभ घेतला. नवदुर्गा दर्शनमध्ये पद्मावती देवस्थान मार्गताम्हाणे, करंजेश्वरी गोवळकोट, रेणुकामाता परशुराम, झोलाई वालोपे, जुना भैरी चिपळूण, राम वरदायिनी दादर, भवानीमाता टेंरव, दहीवली मंदिर, शारदादेवी तुरूंबव आदी देवीचे दर्शन या महिलांनी घेतले. या सेवाभावी उपक्रमाबद्दल या महिला भक्तांनी विपुल कदम यांचे आभार मानले.