गुहागर – गुहागर तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच अतुल लांजेकर यांच्या विरोधात अविश्वासचा ठराव गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे.
झोंबडी ग्रामपंचायती मध्ये लोकनियुक्त सरपंच अतुल लांजेकर यांच्या विरोधात आज या ग्रामपंचायतीचे पाच सदस्य यांनी हा अविश्वासचा ठराव दाखल केला. या ग्रामपंचायतीमध्ये विकास कामात झालेले गैरव्यवहार, ग्रामपंचायतच्या सदस्यांना आर्थिक व इतर व्यवहारात विचारात न घेता सरपंचाचा एकतर्फी मनमानी कारभार, सर्वसाधारण ग्रामसभेत ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामाबाबत व झालेल्या गैरव्यवाराबाबत ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांची आयोजित ग्रामसभेत सरपंचांनी दिलेली असमाधानकारक उत्तरे अशी अनेक कारणे या या ठरावास कारणीभूत आहेत. यावेळी गावातील मतदार यादीतील 962 मतदारापैकी गावामध्ये राहत असलेले सद्यस्थितीतील 581 मतदारांच्या पाठिंब्याने या पाच सदस्यांनी हा अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे.
गुहागर तालुक्यात यापूर्वी गिमवी-देवघर ग्रुप ग्रामपंचायत मध्ये अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याच पंचक्रोशीतील झोंबडी या ग्रामपंचायतीमधील लोकनियुक्त सरपंच अतुल लांजेकर यांच्या विरोधात अविश्वादर्शक ठराव दाखल झाला आहे. त्यामुळे या ठरावाचे पुढे काय होणार… ?लोकनियुक्त सरपंच अतुल लांजेकर यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास दर्शक ठराव मंजूर होणार का..? अशा चर्चा सध्या गुहागर तालुक्यात सुरू आहेत.