चिपळूण– मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत चिपळूण जवळील परशुराम घाटातील धोकादायक दरडींच्या सुरक्षिततेच्या उपायोजनांच्या दृष्टीने लोखंडी जाळी व गॅबियन वॉल उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, गॅबियन वॉल घसरण्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून गॅबियन उभारणीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर आल्याने या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून चिपळूण जवळील परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली आहे. या घाटात एका बाजूला २२ मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दरडीच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून लोखंडी जाळी बसवली जात आहे लोखंडी जाळी बसवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
तर दुसरीकडे गेल्या पावसात कोसळलेल्या संरक्षण भिंतीच्या बाजूने गॅबियन वॉल उभारण्याचे काम देखील वेगाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाने जोर धरल्याने सदरील कामे थांबली होती. आता पुन्हा या कामाने वेग घेतला असला तरी मंगळवारी गॅबियन वॉल घसरत असल्याचे समोर आले आहे. पुन्हा एकदा परशुराम घाटातील निकृष्ट कामाचा नमुना समोर आला असल्याने या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असून सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.