मार्गताम्हाने – चिपळूण-गुहागर महामार्गावरील रामपूर ते
गुहागरला जाणारी एका मोबाईल नेटवर्क कंपनीची वाहिनी टाकण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. सध्या मार्गताम्हाने दरम्यान, हे काम सुरु असून ड्रीलींग करुन खोदाई सुरु आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला मातीचे ढीग करण्यात येतात. यामुळे वाहतुकीला अडथळे येत असून अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित ठेकेदाराने मातीचे ढीग त्वरीत हलवून व रस्त्यावरुन आलेली माती बाजूला करावी, अशी मागणी वाहनचालक, प्रवाशांनी केली आहे.
सध्या मोबाईल नेटवर्क कंपनीची वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. चिपळूण ते सावर्डे या दरम्यानचे काम झाल्यावर आता रामपूर ते गुहागर अशी वाहिनी टाकली जात आहे. वाहिनी टाकण्यासाठी ड्रीलींग केले जात आहे. यासाठी रस्त्याच्या कडेने काही अंतरावर ड्रीलींगसाठी मोठे खड्डे मारले जात आहेत. खड्ड्यातील माती रस्त्याच्या बाजूने टाकून तेथेच ढीग केला जात आहे. एक
–एक दिवस हे ढीग जागेवरच दिसून येतात. तसेच रस्त्याच्या कडेने गेलेल्या जलवाहिनीनाही धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी अरुंद रस्त्यांमुळे हे ढीग वाहतुकीला अडथळे ठरत आहेत. वाहिनी टाकून झाल्यावर संबंधित खड्डे माती टाकून बुजविले जातात मात्र, संपूर्ण रस्त्यावरील संपूर्ण माती काढून साफसफाई केली जात नाही.
रस्त्यावरुन एकाचवेळी दोन वाहने जाताना एखादे वाहने बाजू देताना रस्त्याच्या कडेला येते त्यामुळे एखादे वाहन घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे रस्त्यावरील संपूर्ण माती काढून तेथील साफसफाई केली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. कंपनी ठेकेदाराने याची गांभीर्याने दखल घेऊन मातीचे ढीग त्वरीत बाजूला करावेत. तसेच काम सुरु असताना आपल्या मशीनरी एका बाजूने उभ्या कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.