गुहागर ( प्रगती टाइम्स टीम ) – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते अण्णा जाधव यांच्यावर गुहागर तालुक्यातील नरवण येथील हॉटेल सावली बाहेर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते मात्र आज अखेर याप्रकरणातील दोन आरोपींना गुहागर पोलिसांनी अटक केली असून अन्य 5 जणांचा शोध सुरु असल्याची माहिती गुहागर पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी दिली.
गुहागर ; या राजकीय नेत्यावर प्राणघातक हल्ला
विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदानाच्या दोन दिवस आधी नरवण येथील सावली हाँटेलच्या बाहेर वंचित बहुजन विकास आघाडीचे अण्णा जाधव यांच्यावर चाकूहल्ला झाला होता. यानंतर अज्ञात आरोपींनी या हल्ल्यानंतर पळ काढला होता. त्यामुळे ऐन निवडणुकीत एकच खळबळ उडाली होती. यावेळी संपूर्ण राज्यात गुहागर चा हा हल्ला नक्की कोणी केला.? का केला ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तर याच हल्ल्याच्या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबावही होता त्यामुळे पोलीस गेले दहा दिवस तालुक्यातील सर्व प्रकारचे सीसीटीव्ही तपासात या हल्ल्याचा तपास करत होते आज अखेर या हल्ल्यातील दोन संशयतांना पकडण्यात गुहागर पोलिसांना यश आले आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या गुन्ह्यामध्ये आरोपी अनुप नारायण जाधव राहणार बदलापूर पश्चिम व कुणाल किसन जुगे राहणार अंबरनाथ पश्चिम यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने सदर आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात यश आले आहे. सध्या आरोपींची कसून तपासणी व चौकशी सुरू असून हा हल्ला का केला याबाबत अधिक माहिती गुहागर पोलीस घेत आहेत.