कणकवली — महाविकास आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा आज कणकवलीत पार पडली यावेळी त्यांनी नारायण राणे आणि भाजपवर जोरदार टीका केली. मी कोकणात येणार होतो, तर मला धमक्या यायला लागल्या. कसा येतो बघतोच, अशी मला धमकी आली. तर आपल्याकडे एक म्हण आहे. शुभं बोल रे नाऱ्या. कोकण तर माझं घरचं आहे. इथं मला कोणी आडवं आलं तर त्याला गाडून पुढं गेल्याशिवार राहणार नाही. यापूर्वी ह्यांना दोनवेळा यांच्याच घरात जाऊन आडवं केलं. एकवेळा आमच्या घराकडे आले तिथेही त्याला आडवं केलं. रत्नागिरीमध्ये “बेअकली जनता पार्टी”चे लोकं आले होते. हे आपल्याला नकली म्हणतात. बेअकली जनता पार्टीचे सरदाराने येऊन मला आव्हान दिलं. तुम्ही दहा वर्षे काय केलं? कोंबडी चोरांला सोबत घेऊन काही करता आलं नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर नाव न घेता केली.
अमित शाह आम्हाला अयोध्येत राम दर्शनासाठी का गेले नाही म्हणून विचारत आहेत. मग तुम्ही तुळजाभवानी मंदिरात गेला आहात का? मी काळाराम मंदिरात गेलो होतो, त्याचं महत्त्व माहीत आहे का? बाबासाहेब आंबेडकर हे काळाराम मंदिरात गेले होते. त्यावेळी तुमच्यासारख्या बूरसटलेल्या लोकांनी त्यांना रोखले होते. मी सावरकारांवर विधानसभेत बोललो आहे. शामा प्रसाद मुखर्जीबद्दल भाजप नेते का बोलत नाही? ते मुस्लिम लीगसोबत गेले होते ना? भाजपच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांबद्दल मला आजही आस्था आहे. एका बाजूला विनायक आणि दूसऱ्या बाजूला खलनायक अशी परिस्थिती आहे, अशी टीका ठाकरेंनी केली.
मोदी सरकार आता गझनी सरकार आहे. त्यांचे या आधीचे थापानामा बाहेर काढा. तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही त्याला आम्ही काय करणार? म्हणून यांना आमची मुलं कडेवर लागतात. ज्याला बाळासाहेबांनी बाहेर काढला होता. त्यांना तुम्ही सोबत घेता. 2005 पर्यंत याची मस्ती होती. श्रीधर नाईक, गोवेकेर, कसे गायब झाले? त्यांच्या हत्या कशा झाल्या? असा सवाल यावेळी ठाकरेंनी उपस्थित केला.