चिपळूण – गेल्या काही वर्षांपासून येथे गोवा बनावटीच्या दारूचा महापूर आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. उत्पादन शुल्क व पोलीस अधूनमधून करीत असलेल्या कारवाईवरून त्यावर शिक्कामोर्तबही होत आहे, असे असताना धडक कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या शहरासह तालुक्यातील टपऱ्यांवर या दारूची खुलेआम विक्री होताना दिसत आहे.
शहरासह ग्रामीण भागात दारूचा पुरवठा करणारी मुख्य केंद्र असल्याची माहिती पुढे येत आहे. काही वर्षे मागे जाता येथे गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत होती. मात्र, घडलेल्या काही घटना व त्यानंतर पोलिसांनी ठेवलेली कडक भूमिका यामुळे आता गावठी दारूची विक्री कमी झाली असून आजही काही भागात चोरटी विक्री होत आहे. मात्र, तेथील महिला व तरूणांच्या पुढाकाराने गावठी दारूवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे आता गावठी दारूची जागा गोवा बनावटीच्या दारूने घेतली असून गावठी दारूचा व्यवसाय करणारेच ही दारू विकत असल्याची माहिती उपलब्ध होत आहे.
शहरासह तालुक्यातील नाक्यानाक्यावर असलेल्या टपऱ्यांमधून या दारूची दिवसरात्र खुलेआम विक्री होत आहे. ही दारू बाटलीत मिळत असल्याने तेथे पिण्याचा प्रश्न येत नसून दारू खरेदी करून संबंधित मद्यपी अन्य ठिकाणी जाऊन ती पित आहेत. या दारूच्या विक्रीतून बक्कळ पैसा मिळत असल्याने छोटे व्यावसायिकही मालेमाल होत आहेत. त्यांनी दारूच्या साठ्यासाठी खास व्यवस्था केली ती जंगलमय भागात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सध्या शिमगोत्सव सुरू असल्याने तिची मागणी वाढली आहे. त्यामुळे तितकाच साठा अनेक ठिकाणी करून ठेवण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या बाबत अधिक माहितीसाठी उत्पादन शुल्क व पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी प्रतिसाद दिला नाही.