चिपळूण – चिपळूण तालुक्यातील दसपटी परिसरातील कादवड येथे वैतरणा नदीलगत दोन शाळकरी मुलींचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून या मुलींचा घातपात झाला की आणखी काही याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
सोनाली राजेंद्र निकम (वय 14) आणि मधुरा लवेश जाधव (वय 14 रा. कादवड) या मोहन विद्यालय अकले शाळेच्या इयत्ता नववीतील विद्यार्थिनी आहेत. त्यांचे मृतदेह नदी लगत सापडल्याने दसपटी विभागात एकच खळबळ उडाली आहे. कातकरी समाजातील या गरीब कुटुंबातील मुली असून त्यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. आज दुपारच्या वेळी कादवड वैतरणा नदीतील एका डोहाजवळ त्यांचे मृतदेह आढळून आले. यानंतर तेथील ग्रामस्थांनी शिरगाव पोलिसांना ही खबर दिली. पोलीस दाखल होताच त्यांनी तात्काळ दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही मृतदेह आणले. दादर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.