गुहागर – ( प्रशांत चव्हाण ) – राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आपल्या पक्षाला मिळालेली निशाणी तुतारी ऐतिहासिक रायगडवरुन फुंकली. या तुतारीचा गगनभेदी आवाज गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप तरी पोहचलेला नसला तरी एका वेगळ्याच राजकीय तुतारीचा नाद गुहागरच्या शिंदे गटाकडून घुमवला गेला आहे. जिथे आपल्या पक्षाला अद्याप साधा अंकुरही फुटलेला नाही अशा तालुक्यात शिंदे गटाने फुंकलेल्या तुतारीचा आवाज घुमणार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची जाहीर सभा आज शनिवारी गुहागर तालुक्याच्या राजधानी शंृगारतळीत होत आहे. या सभेला येथील जनतेचा कितपत प्रतिसाद मिळतो, यावरुनच येथील शिंदे गटाचे भवितव्य अधोरेखित होणार आहे.
15 वर्षापूर्वी भाजपची निर्विवाद सत्ता असलेला गुहागर मतदारसंघ त्यावेळी युतीमध्ये झालेल्या जागा वाटपाच्या अदलाबदलीत शिवसेनेला मिळाला आणि खऱ्या अर्थाने येथे राजकीय उलथापालथ घडून आली. गुहागर मतदारसंघात खेड तालुक्यातील 110 गावे समाविष्ट असल्याने खेडचे रामदास कदम यांनी येथून युतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. येथूनच राजकीय ठिणगी पडली. भाजपचे 25 वर्षे आमदार असलेल्या डाँ. विनय नातू यांनी हा मतदारसंघ मित्रपक्ष सेनेला मिळाल्याने बंडाचे निशाण उभारुन श्रीधर सेनेच्या माध्यमातून अपक्ष निवडणूक लढविली. या निवडणुकीत शिवसेनेचे रामदास कदम यांचा निसटता पराभव झाला. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या म्हणीनुसार, त्यावेळी
राष्ट्रवादीचे भास्कर जाधव निवडून आले. गेली 10 वर्षे राष्ट्रवादीचे आमदार असलेले भास्कर जाधव 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अचानक शिवसेनेत गेले व येथून त्यांनी निवडणूक लढवून विजयी झाले. अनपेक्षितपणे झालेल्या गुहागरच्या या राजकारणात शिवसेनेला आपले चांगले पाय रोवण्याची संधी आ. जाधव यांच्या रुपाने मिळाली. तत्पूर्वी गुहागरमध्ये पराभव झालेल्या रामदास कदमांनी गुहागरकडे साधे वळूनही पाहले नाही ते आजतागायत.
गेल्या अडीच वर्षापूर्वी राज्यात झालेल्या सत्तानाट्यात शिवसेनेतून बाहेर पडून 40 आमदारांचा गट भाजपला जाऊन मिळाला आणि मूळ शिवसेनेला हादरा बसला. यानंतर शिवसेनेतून काही ज्येष्ठ नेतेही बाहेर पडले व शिंदे गटाच्या वळचळणीला जाऊन बसले. यामध्ये रामदास कदमांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यातच शिंदे गटाला हिच खरी शिवसेना व मूळ शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने आत्मविश्वास बळावलेल्या रामदास कदम यांनी खेड मतदारसंघावर आपल्या सुपूत्राच्या रुपाने आमदार असताना आता गुहागर मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळवला असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या तर नवल नाही.
गुहागर मतदारसंघातील लोटे विभागात रामदास कदम यांची पहिली सभा झाल्यानंतर त्यांची दुसरी सभा गुहागर तालुक्यात होत आहे. यानंतर ती चिपळूण तालुक्यातील 73 गावांची मिळून घेण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केले आहे. मात्र, रामदास कदम यांनी अचानक गुहागरकडे मोर्चा का वळवला असावा याविषयी शंका आहे. सध्या लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपावर महायुतीत अंतर्गत संघर्ष उफाळून आलेला असल्याने प्रसारीत वृत्तानुसार समोर येत आहे. भाजपला थेट अंगावर घेऊन त्यांच्यावर टीका करणारा एखादा नेता शिंदे गटाने तयार केलेला असावा व या दबावतंत्राने लोकसभेच्या पसंतीच्या सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा हा मनसुबा शिंदे गटाचा असावा व यातूनच रामदास कदमांसारखे ज्येष्ठ नेते अलिकडे केसाने गळा कापणे, विश्वासघात करु नका असे वक्तव्य करत एकप्रकारे भाजपवर निशाणा साधताना दिसत आहेत.
गुहागर तालुक्यात शिंदे गटाचा अजूनही मागमूस नाही. केवळ तालुकाप्रमुख, उपतालुका प्रमुख व संघटक नेमून शिंदे गटाने आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे आणि रामदास कदम यांना भर घालून गुहागरकडे लक्ष केंद्रीत करावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे असे साकडे घातले आहे. यातून शक्तीप्रदर्शनाचा हेतू असला तरी महायुतीतील मित्रपक्ष भाजपला व उद्ध्व ठाकरे प्रणित भास्कर जाधवांना अप्रत्यक्षपणे डिवचण्याचा हा प्रकार आहे. गुहागरची जागा त्यावेळी शिवसेनेच्या वाट्याला आली होती तोच मुद्दा पुढे करुन आता गुहागरचा मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या शिंदे गटाचा महायुतीत बेबनाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. या सभेला राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे हेही उपस्थित राहणार आहेत मात्र, नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख चव्हाण यांनी महायुतीचाच उमेदवार असेल असे सांगून भाजपच्या नेत्यांना आम्ही बोलवणार आहोत अशी उडवाउडवी करुन वेळ मारुन नेली. त्यामुळे निलेश राणेंच्या महिनाभरापूर्वीच्या सभेने चार्जींग झालेल्या गुहागर भाजपविरोधात शिंदे गटाने रामदास कदम यांच्या सभेतून एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.
राहिला मुद्दा गुहागर तालुक्यातील शिंदे गटाच्या भवितव्याचा. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून गुहागरमधील विकासकामांना भरघोस निधी मिळाल्याचा मुद्दा पुढे करुन शिंदे गटाने येथे पक्षबांधणीचा मोठा गवगवा करुन ठेवला आहे. मात्र, यातून काही राजकीय हेतू निष्पन्न होईल असे सध्याचे तरी चित्र नाही. रामदास कदमांच्या सभेने यातून काय साध्य होणार आहे हाही प्रश्न अनुत्तरीत आहे. मुळातच भास्कर जाधवांकडे असणारा गुहागरचा मूळ शिवसैनिक याकडे वळेल का व सभेला खेड तालुक्यातील जनसमुदाय आणून ही सभा यशस्वी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न तर नसेल, असे कितीतरी प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यामुळे शिंदे गटाने ही फुंकलेली तुतारी पोकळ न ठरो, एवढीच अपेक्षा आहे.