चिपळूण – काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी पवार यांनी यादव यांचे उत्स्फूर्त स्वागत करीत चिपळूण-संगमेश्वरमधून प्रशांत यादव यांना राजकीय ताकद देऊया असे आवाहन केले. तर प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी जे-जे काँग्रेस पक्ष सोडून गेले आहेत. त्यांच्या समोर आम्ही पर्याय उभा करीत असून तरुण, नवा चेहरा प्रशांत यादव यांच्या निमित्ताने पुढे आणण्याची संधी मिळाली असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थितांनी प्रशांत यादव यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीब सिद्दिकी, प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रमेश कदम, रत्नागिरी जिल्ह्याचे निरीक्षक बबन कनावजे व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश बने आदी मान्यवर उपस्थित होते.
गेली काही वर्ष प्रशांत यादव सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चिपळूण तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आपले राजकीय अस्तित्व सिद्ध केले. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून प्रशांत यादव राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात प्रवेश करणार अशी चिपळूणच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.
दरम्यान, शनिवारी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आदींनी प्रशांत यादव यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) उत्स्फूर्तपणे स्वागत केले.