रत्नागिरी – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी कोकणातील राजापूर येथे येत असून त्यांच्या जंगी सभेचे याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या सभेत रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महायुतीकडून लोकसभा निवडणूक कोण लढविणार याची घोषणाच मुख्यमंत्री करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या सभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राजापूर येथे ही सभा होईल. यासाठी शिंदे गटाकडून जोरदार नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे काय बोलणार याचीच उत्सुकता सर्वांना आहे. मात्र, याच सभेत आगामी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीतील उमेदवाराचा प्रश्नही निकाली लागणार असल्याची चर्चा आहे. तशी घोषणाच शिंदे करू शकतात असे ठामपणे सांगितले जात आहे. या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात एकमत न झाल्याने ‘खासदार’कीचा नेमका उमेदवार कोण? याविषयी गेले अनेक दिवस उलटसुलट चर्चा होतं आहेत.
दरम्यान, या जागेसाठी पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैया सामंत यांना उमेदवारी जवळपास ‘फिक्स’ झाली असे भासवले जात असतानाच भाजपकडून बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळणार आहे अशी बातमी पसरविण्यात आली. तर किरण सामंत यांनाही ‘त्या’ बातमीनंतर ‘मी किरण सामंत… रोकेगा कोन…?’ असे स्टेटस ठेवून एकच खळबळ उडवून दिली. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ना. शिंदे उद्या काय घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.