गुहागर मतदार संघात विकास कामांवरून आरोप प्रत्यारोप… भाजप शिवसेना मध्ये श्रेयासाठी लढाई….

0
277
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर मतदारसंघात सध्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका मोठ्या जल्लोषात सुरू आहे. मात्र ही सर्व विकासकामे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या प्रयत्नातून झाली आहेत. गुहागर विधानसभा मतदार संघातील तब्बल ९ मार्गाना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे चांगले ते आपले व वाईट ते मोदी सरकारचे याचे खापर फोडणाऱ्यांनी याचेसुद्धा श्रेय लाटून जनतेची दिशाभूल करू नये. असा टोला भाजपाचे गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी आमदार भास्कर जाधव यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेतून लगावला आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक व सर्व पदाधिकारी यांनी शृंगारतळी येथील मध्यवर्ती कार्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

आजपर्यंत येथील काहींनी ५०० मिटरच्या रस्त्याची मंजूरी घेत येथील जनतेकडून मतांसाठीचे राजकारण केले. परंतु माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी चार ते पाच गावांना जोडताना १० किलोमिटरपर्यंतचा एक मार्ग अशा गुहागर तालुक्यातील १२ मार्गाचे प्रमुख जिल्हा मार्गामध्ये रूपातरण करण्यासाठीची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत यावर २२ ऑगस्ट रोजी मंत्रालयामध्ये बैठक घेण्यात आली. डॉ. नातूंनी सुचवलेल्या गुहागर तालुक्यातील १२ मार्गांपैकी ६ मार्ग तर गुहागर विधानसभा मतदार संघातील खेड व चिपळूण तालुक्यातील चार असे ९ मार्गांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा मिळाला आहे.

यामध्ये शृंगारतळी, जानवळे, तळवली, भडकंबा, मुंढर असा १८ किलोमिटर, नरवण मुसलोंडी वाघांबे दोडवली १३ किमी रस्ता, कोळवली पाचेरी सडा, पाणबुडी सडा, पाणबुडी मंदिर, कवठेवाडी पाचेरीसडा बौद्धवाडी ते पाचेरी आगर आवरे १८ किलोमिटर, रोहीले तवसाळ आगर पूल मोहितेवाडी तांबडवाडी कर्दै सनगरेवाडी दोडवली काताळे तेलीवाडी मराठवाडी बौद्धवाडी व सावर्डे तवसाळ १३.५०० किलोमिटर रस्ता, शिर मोरेवाडी मासू बुद्रुक तळयाचीवाडी म्हसकरवाडी नाचरे कोंडवीवाडी जुनी फौजदारवाडी मासू खुर्द जाधववाडी १०.२०० किलोमिटर रस्ता, पालकोटतर्फे साखरी त्रिशुल ते पेवे मादाली ते पेवे मोटलेकरवाडी गुरवकोंड खरेकोंड ते तळवली प्राथमिक आरोग्य केंद्र परचुरी जंगल जेट्टी ते परचुरी डाफळेवाडी १८.६५० किलोमिटर रस्ता अशा सहा रस्त्यांचा प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा मिळाला आहे.

१० किलोमिटरपेक्षा जास्त मार्गामध्ये चार ते पाच गावांना बरोबर घेऊन कोटयावधीचा निधी या रस्त्यांना मिळू शकतो. याचा विचार करून हे मार्ग डॉ. नातूंच्या प्रयत्नाने प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून जाहीर झाले आहेत. एका बैठकीतून तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग करून घेणार आहे असे येथील आमदारांनी जाहीर केले होते. आमदार भास्कर जाधव श्रेय घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार, यासाठी ही माहिती जनतेपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे निलेश सुर्वे यांनी सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here