खेड – गणेशोत्सवमध्ये मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सुरू करण्यात आलेला कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे. बोगद्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आगामी चार ते पाच दिवसांमध्ये बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून गणेशोत्सवासाठी सुरू करण्यात आली होती. या बोगद्यातून एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू होती. त्यामुळे कोकणवासियांना मोठा फायदा झाला होता.
गणेशोत्सवाच्या काळात कशेडी घाटातून एकेरी मार्गिकेवरून वाहतूक सुरू असल्याने कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला होता. आता या बोगद्यातून वाहतूक चार ते पाच दिवसात बंद करण्यात येणार आहे. या बोगद्याच्या उर्वरित कामाला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.