भास्कर जाधव मला अजूनही आशीर्वाद द्यायला तयार नाहीत! – उदय सामंत

0
451
बातम्या शेअर करा

चिपळूण – एखाद्या अधिकाऱ्याने चांगले काम केले की लोकप्रतिनिधी सुद्धा यशस्वी ठरतो. चांगला अधिकारी मिळवण्याचे कौशल्य आमदार भास्कर जाधव यांच्याकडे आहे. याबाबत त्यांचे म्हणावे तेवढे कौतुक कमीच आहे. त्यांचा आशीर्वाद अनेकांना मिळतो, पण मला ते आशीर्वाद द्यायला तयार नाहीत, अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी कोपरखळी मारताच सभागृहात एकच हश्या पिकला. निमित्त होते ते चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे!

चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे १८ वर्षांनंतर नूतनीकरण होऊन मंगळवारी स्वातंत्र्यदिनी त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, जिल्हाप्रमुख सचिन कदम हे एका व्यासपीठावर होते. या संपूर्ण कार्यक्रमात एकापेक्षा टोलेबाजी प्रांताधिकारी आकाश लिंगाडे, मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रसाद शिंगटे, यांच्यासह अनेक राजकीय व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, आमदार भास्कर जाधव यांना मी धन्यवाद देतो की, त्यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यासारखा अधिकारी या जिल्ह्यात आणला. त्यांनी गुहागरमध्ये आणून त्यांना ट्रेंनिग दिली आणि ते चिपळूणमध्ये आले. त्यामुळेच फक्त ७५ दिवसात त्यांनी नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले. भास्कर जाधव यांनी त्यांना आशीर्वाद दिला, पण मला ते अजूनही आशीर्वाद द्यायला तयार नाहीत, अशी कोपरखळी मारली. एवढेच नव्हे तर सामंत हे आमदार शेखर निकम यांच्या विषयी म्हणाले की, हल्ली निकम जास्तच मूडमध्ये आहेत. त्यांनी काही विषय माझ्या कानात सांगतीलेत. पण या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी शब्द देतो. तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यास मी कटिबद्ध आहे. शेखर निकमांनी फार उशीर केला. अगोदरच आमच्या बरोबर आले असते, तर यापूर्वीच मागण्या पूर्ण झाल्या असत्या. ही त्यांची व अजित दादांची चूक आहे मी काय करू, असा टोला लगावताच पुन्हा नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
आमदार भास्कर जाधव यांनीही जोरदार फटकेबाजी केली. चिपळूणचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांचा गुहागरचा शिक्षक मीच होतो, एवढेच नव्हे तर रत्नागिरीचे आताचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांना चांगला अधिकारी म्हणून चिपळूण तहसीलदारपदी आणणारा देखील मीच होतो, हे नमूद करण्यास देखील ते विसरले नाहीत. यानंतर आमदार शेखर निकम यांनी तर धमालच उडवून दिली. सर्वात मोठे कलाकार तर आम्हीच आहोत. आम्ही कधी शत्रू, तर कधी मित्र होतो हे कोणालाच कळत नाही, असे बोलताच सभागृहात एकच हश्या पिकला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here