गुहागर– गुहागर तालुक्याच्या विकासात रत्नागिरी गँस प्रकल्प महत्वाची भूमिका बजावत आहे. विकासाबरोबरच रोजगारीला प्राधान्य देण्यात आले आहे. गुहागर तालुक्याच्या विकासासाठी ही कंपनी आवश्यक असून देशात सर्वाधिक वीजनिर्मितीची क्षमता असणारा हा प्रकल्प आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने तिला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्नशील असावे असे स्पष्ट मत आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अग्रवाह यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी गँस ऊर्जा प्रकल्पाची सध्याची स्थिती व एकूण वीजनिर्मिती क्षमता व तालुक्याच्या विकासाच्यादृष्टीने तिचे असणारे महत्व व कंपनीची भूमिका या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन आरजीपीपीएल प्रशासनाकडून कंपनी येथे करण्यात आले होते. यावेळी कंपनीचे हेड एच.आर. जाँन फिलीप, अप्पर महाप्रबंधक अंतरयामी दास, विकास सिंह, दामोदर सुरेश, मुख्य वित्त अधिकारी पंकज झा, प्रबंधक अमित शर्मा, हेड. संविधान व सामग्री दीपक पाटील आदी उपस्थित होते. कंपनीमधील कामगारांचा मुद्दा यावेळी अधिकाऱ्यांनी मांडला. कंपनीत कायमस्वरुपी असणाऱ्या कामगारांना कंपनीने कधीही कमी केलेले नाही. जे ठेका पध्दतीने होते त्यांनाच कमी करण्यात आले आहे. कंपनीने तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना मदत, टंचाईच्या काळात गावांना पाणीपुरवठा करणे, अनेक उपक्रम राबविणे अशी विधायक कामे केलेली आहेत. पाण्याचे रिसायकलींग करण्याकामी कंपनीला पुरस्कारही मिळाला आहे.
सध्या मागणीनुसार, २०० मेगावँट वीजनिर्मिती सुरु असून क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेतल्यास कंपनीला नक्कीच उर्जितावस्था प्राप्त होईल, या प्रकल्पाची 2000 मेगावँट
ची क्षमता असताना फक्त 200 मेगावँट वीजनिर्मिती होत आहे. जर या प्रकल्पाला 2000 मेगावँट वीज निर्मिती करण्यास मिळाली तर हा प्रकल्प तेवढ्या क्षमतेने चालू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्यावर्षी सलग ९ महिने प्लाँट बंद राहिला होता. वीजनिर्मितीवर मोठा परिणाम झाला होता. त्यावेळी कामगारांची संख्या कमी झाली. त्यामुळे ठेका पध्दतीने काम करणाऱ्या कामगारांना कमी करण्यात आले होते. हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारला वीज पुरवठा करण्यासाठी कार्यान्वीत झाला होता. राज्य सरकारने आम्हाला जर मदत केली तर ऊर्जा प्लाँट सुरु होऊ शकतो आणि जे नुकसान झाले आहे पूर्णतः भरुन निघेल, जेणेकरुन परिसरातील गावांमधील कामगार आम्हाला मिळून त्यांना रोजगारही उपलब्ध होईल, असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
आजपर्यंत आमच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगाराला कोणतीही दुखापत झालेली नाही. सुरक्षा व्यवस्थाही चांगली आहे. त्यांना सरकारच्या नियमानुसार, योग्यप्रकारच्या सुविधाही मिळालेल्या आहेत. कोणत्याही वेळी वीजेची मागणी आल्यास एक तासात आपण त्यांना वीज देऊ शकतो. कोळशावरती चालणाऱ्या प्रकल्पांना काही तासांचा अवधी लागतो. आमच्या कंपनीचे तसे नाही. हा प्रकल्प गँसवर चालत असल्याने केव्हाही वीज उपलब्ध करु शकतो, एवढी क्षमता येथील प्लाँटमध्ये आहे. सौर ऊर्जेवरील वीजेचेही असेच आहे. वेळेवर लगेच उपलब्ध होत नाही. मात्र, गँसवरील प्रकल्पातून त्वरीत वीज उपलब्ध होते, त्यामुळे ऊर्जेची क्षमता वाढविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.
–तंत्रज्ञान व वीजनिर्मितीत अग्रेसर
राज्यात चांगले तंत्रज्ञान आणि सर्वाधिक मेगावँट वीजनिर्मिती करणारा हा प्रकल्प आहे. कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पामध्ये अचानक एखादी वीजेची मागणी आली तर पुरवठा करण्यास किमान १० तास लागतात. मात्र, गँसवर चालणाऱ्या प्रकल्पातून एक तासात वीजनिर्मिती करुन ती पुरवठा करण्याची क्षमता असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. ही कंपनी देशाचा मुकुट आहे. सुरु झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळू शकतो.